पैशांची गुंतवणूक करणे हे आपल्या समृद्ध जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पैशांची आवश्यकता भासते व त्यामुळे आपल्याकडे पुरेशा प्रमाणात पैसा असणे खूप गरजेचे असते.
याकरिता गुंतवणूक ही संकल्पना खूप महत्त्वाची असून तुम्ही कमावलेल्या पैशांची बचत करून त्या पैशांची गुंतवणूक केली तर मिळणाऱ्या परताव्याच्या माध्यमातून तुम्ही समृद्ध आर्थिक जीवन जगू शकता. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांकडून प्रामुख्याने पसंती दिली जाते.
कारण केलेली गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या योजना खूप फायद्याच्या ठरतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना पोस्ट ऑफिस राबवत आहे.
यामध्ये पोस्ट ऑफिसची एक योजना ही खूप महत्त्वाची असून तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल व त्या गुंतवणुकी सोबत नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसची एमआयएस म्हणजेच मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतात व यामध्ये एक रकमी गुंतवणूक करून तुम्ही लगेचच पुढच्या महिन्यापासून व्याजाद्वारे तुमची कमाई सुरू करू शकतात.
कसे आहे पोस्ट ऑफिसच्या एमआयएस म्हणजेच मंथली इनकम स्कीमचे स्वरुप?
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम म्हणजेच एमआयएस ही योजना गुंतवणुकीसाठी एक खूप चांगला पर्याय आहे. या योजनेमध्ये तुम्ही एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याजाद्वारे नियमितपणे उत्पन्न सुरू होते. या योजनेमध्ये गुंतवणुकीवर 7.4 टक्के दराने व्याज मिळते.
तुम्ही जर पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीममध्ये खाते उघडले व खाते उघडण्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लगेचच व्याजाचा लाभ मिळण्यास सुरुवात होते व या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळत राहते. म्हणजेच तुम्ही जे काही एक रकमी रक्कम यामध्ये गुंतवलेली असते व त्या रकमेवर मिळणारे व्याज तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिले जाते.
या योजनेत तुम्ही एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह खाते उघडू शकतात. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक तसेच जॉइंट अकाउंट देखील उघडता येते. या योजनेमध्ये एक खातेदार कमाल नऊ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतो तर जॉइंट अकाउंट जर उघडले असेल तर जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून करता येते.
या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते असणे गरजेचे आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली किंवा त्याहून अधिक वयाची कोणत्याही व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करता येते.
अशा पद्धतीने एकदा गुंतवणूक केल्यावर महिन्याला पाच हजार रुपये पर्यंत कमाई करता येईल
या योजनेमध्ये जर तुम्ही एकरकमी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 7.4 टक्के व्याजाने तुम्हाला दर महिन्याला तीन हजार पर्यंत व्याज दिले जाते व हे प्रत्येक महिन्याला तुम्हाला उत्पन्न म्हणून मिळते. जर नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर जास्तीत जास्त प्रत्येक महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये व्याज होते व तुम्हाला दर महिन्याला मिळते. या योजनेचा लॉक इन पिरेड म्हणजेच कालावधी हा पाच वर्षाचा आहे.
समजा तुम्ही संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट उघडले व एकरकमी 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला या गुंतवणुकीवर 7.4 टक्के दराने दरमहा नऊ हजार दोनशे पन्नास रुपयांचे व्याजापोटी उत्पन्न मिळेल. विशेष म्हणजे या योजनेचे पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर या योजनेचे खाते बंद केले जाते व अनामत रक्कम नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसांना परत केली जाते.
योजना बंद झाल्यानंतर मात्र शेवटच्या महिन्यापर्यंत व्याज दिले जाते. समजा या योजनेचा कालावधी पूर्ण होण्याआधी तुम्ही तुमचे खाते बंद करायचे ठरवले तर गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ते करता येते. या योजनेत खाते उघडल्याच्या एक वर्षानंतर आणि तीन वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास
गुंतवणूक केलेल्या रक्कमेतून दोन टक्के इतकी रक्कम वजा केली जाते व उरलेली रक्कम तुम्हाला मिळते. तसेच खाते उघडलेल्या तारखेपासून तीन वर्षानंतर आणि पाच वर्षांपूर्वी तुम्ही खाते बंद केले तर तुमच्या जमा रकमेतून एक टक्के इतकी रक्कम कपात केली जाते व उरलेली रक्कम तुम्हाला मिळते.