आर्थिक

केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये धूम! 300 मेगावॅट ऑर्डरमुळे होईल का मोठा बदल?

Published by
Ratnakar Ashok Patil

KPI Green Energy Share:- सौर ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीला कोल इंडियाकडून ३०० मेगावॅट क्षमतेचा मोठा वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. या ऑर्डरमुळे शेअरच्या किमतीत ५ टक्क्यांच्या सर्किट ब्रेकरने उडी घेतली आणि ३४९ रुपयांवर पोहोचला.

बुधवारी कंपनीने ओडिशा सरकारसोबत अक्षय ऊर्जा पार्क स्थापन करण्यासाठी करार केल्यावर शेअरने पुन्हा ५ टक्क्यांच्या सर्किटला स्पर्श केला. तथापि या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ३० जानेवारी रोजी ३१२ रुपये होता. गेल्या सहा महिन्यांत शेअरच्या किमतीत ६० टक्क्यांची घसरण झाली होती.

कंपनीने केला महत्त्वाचा करार

केपीआय ग्रीन एनर्जीने कोल इंडियासोबत ३०० मेगावॅट क्षमतेचा सोलर पीव्ही प्लांट विकसित करण्याचा करार केला आहे. या प्रकल्पाची किंमत १३११.४ कोटी रुपये असून तो नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.

या कराराच्या मदतीने कंपनीला पुढील ५ वर्षांसाठी ऑपरेशन आणि देखभाल करण्याचे काम मिळणार आहे. हे प्लांट गुजरातमधील खावडा सोलर पार्कमध्ये विकसित केले जाईल. कंपनीने २०३० पर्यंत १० गिगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे.

कंपनी सौर आणि हायब्रीड ऊर्जा दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे आणि ती पॉवर प्लांट विकसित करते व चालवते. इतकेच नाहीतर त्यांची देखभाल करते.

कंपनीने आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत कॅप्टिव्ह पॉवर क्षेत्रातून ८८ टक्क्यांचा महसूल मिळवला आहे. २०२४ पर्यंत, कंपनीकडे २.४ गिगावॅट पेक्षा जास्त ऑर्डर्स होत्या आणि तिच्या लँड बँकमध्ये ३०७१ कोटी रुपयांचा संसाधन आहे.

परदेशी गुंतवणूकदारांमध्ये मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स, बँक ऑफ अमेरिका, एचएसबीसी आणि सीआयटीआय ग्रुप यांनी गुंतवणूक केली आहे, तर भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि मोतीलाल ओसवाल यांचा समावेश आहे. सध्या कंपनीचा शेअर ३५० रुपयांच्या पातळीवर आहे आणि ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने ७४५ रुपयांचा उच्चांक गाठला होता.

Ratnakar Ashok Patil