LIC Adharshila Policy:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून उपलब्ध पर्यायांपैकी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी हा देखील एक उत्तम असा पर्याय असून गुंतवणुकीतून चांगला परतावा आणि विम्याचे संरक्षण या दृष्टिकोनातून एलआयसीच्या अनेक योजना खूप फायदेशीर आहेत.
एलआयसीच्या माध्यमातून लहान मुलांपासून तर प्रौढांपर्यंत आणि महिलांकरिता देखील अनेक योजना राबवण्यात येतात. गुंतवणूक ही संकल्पना पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठी देखील तितकीच महत्वाची असल्याने गुंतवणुकीच्या या विश्वामध्ये स्त्रिया देखील पुरुषांपेक्षा मागे नाहीत.
परंतु महिलांना बऱ्याचदा गुंतवणूक कुठे करावी याबाबत पुरेशी कल्पना नसल्याने जास्तीचा फायदा त्यांना घेता येत नाही. महिलांच्या दृष्टिकोनातून जर आपण एलआयसीच्या योजना पाहिल्या तर यामध्ये एलआयसीची आधारशीला योजना ही खूप महत्वपूर्ण असून ही योजना फक्त महिलांकरिता आहे.
या योजनेमध्ये महिला दररोज फक्त 87 रुपये गुंतवून योजना परिपक्व झाल्यानंतर म्हणजेच योजनेचा कालावधी संपल्यानंतर चांगला परतावा मिळवू शकतात व ही एक दीर्घकालीन योजना आहे. म्हणजेच दीर्घ कालावधी करिता या योजनेमध्ये महिलांना गुंतवणूक करणे गरजेचे असते.
कसे आहे एलआयसीच्या आधारशिला योजनेचे स्वरूप?
या योजनेमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर वय किमान 8 ते 55 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. संबंधित महिलेकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसी घ्यायची असेल तर तिची मुदत 10 ते 20 वर्षाच्या दरम्यान तुम्हाला निवडता येऊ शकते.
तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे पॉलिसीची मुदत निवडताना पॉलिसी जेव्हा परिपक्व होईल तेव्हा संबंधित महिलेचे कमाल वय 70 वर्षे असावे. म्हणजेच एखादी महिला 55 वर्षाचे असेल तर ती पंधरा वर्षाची पॉलिसी टर्म कालावधी निवडू शकते.या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये ते जास्तीत जास्त पाच लाख रुपये विमा रक्कम मिळते.
म्हणजेच एखाद्या पॉलिसीधारक महिलेचा जर मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबातील सदस्यांना जास्तीत जास्त पाच लाख रुपये मिळतात. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार त्यांच्या बजेट आणि सोयीनुसार कमी हप्त्यांसह देखील ही योजना निवडू शकतात.
दररोज 87 रुपयांचे गुंतवणूक कसे देईल तुम्हाला अकरा लाख?
एलआयसीच्या आधारशीला योजनेमध्ये एखाद्या महिलेने दहा वर्षांकरिता प्रति दिवस 87 रुपये म्हणजेच वर्षाला 31 हजार 755 रुपये गुंतवले तर एकूण दहा वर्षाची गुंतवणूक साधारणपणे तीन लाख 17 हजार पाचशे पन्नास रुपये होते.
अशाप्रकारे वयाच्या 70 वर्षापर्यंत ही रक्कम अकरा लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. त्यामध्ये फक्त तुम्ही जेव्हा गुंतवणुकीला सुरुवात करत आहात तेव्हा तुमचे वय किती आहे यावर हे सगळे गणित अवलंबून आहे.
या योजनेअंतर्गत पॉलिसीवर मिळते कर्ज
एलआयसीच्या आधारशीला योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा म्हणजे गुंतवणूकदार या पॉलिसीवर कर्ज देखील घेऊ शकतात. परंतु अशाप्रकारे पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला किमान दोन वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल व त्यानंतर तुम्ही या पॉलिसी वर कर्ज घेण्यासाठी पात्र होतात.