अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणले जाते. तो जे कष्ट करतो आणि ज्या निस्वार्थ भावनेने जे कार्य करतो ते उल्लेखनीय आहे. यामुळेच भारतात ‘जय जवान, जय किसान’ असे म्हटले जाते .
परंतु बऱ्याचदा निसर्गाची अवकृपा, विविध संकटे बळीराजाला नेहमीच संकटात टाकत असतात. परंतु आता नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, हुशारीने काम केल्यास शेतकरी खूप सारे पैसे कमाऊ शकतो.
याचाच प्रत्यय लोहा तालुक्यातील पोखरभोशी गावामधील बालाजी डांगे या शेतकऱ्याने करून दिलाय. त्यांनी अर्ध्या एकरावरील संकरीत वांग्यानं लाखोंची कमाई केली आहे.
जवळपास 3 लाखांचा नफा त्यांनी कमावला आहे. बालाजी डांगेंनी नोव्हेंबर महिन्यात जमीन भुसभुशीत करुन घेतली. मातीचे वाफे तयार केले. आणि त्यात बियांची लागवड केली.
त्यानंतर बालाजी डांगेंनी गादीवाफे तयार केले. त्यावर मल्चिंग अंथरलं. आणि गादीवाफ्यावर या रोपांची योग्य अंतर सोडून लागवड केली. ठिबक सिंचन करण्यात आलं.
त्यामुळे कमी पाण्यात वांग्याचं पीक आलं. मल्चिंगचाही फायदा झाला. अवघ्या 2 महिन्यांत या झाडांना वांगी लगडली. प्रत्येक वांग्याचं सरासरी वजन 200 ते 500 ग्रॅमच्या दरम्यान आहे.
वांग्याचा पहिला तोडा झाला ज्यात त्यांना 1 टनापर्यंत उत्पादन निघालं. अजून या पिकातून त्यांना 10 ते 11 टन वांग्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे.