आर्थिक

नंदुरबारच्या मयुरीताईंनी 10 हजार रुपये गुंतवणूक सुरू केला ‘हा’ व्यवसाय! आज करतात लाखोत उलाढाल, वाचा त्यांची यशोगाथा

Published by
Ajay Patil

व्यक्तीमध्ये काही करण्याची जिद्द असेल व काहीतरी नाविन्यत्तम आपल्या हातून घडावे व यासोबत स्वतःचा आणि इतरांचा देखील विकास व्हावा इत्यादी वैशिष्ट्य असतील तर ती व्यक्ती कुठल्याही गोष्टीमध्ये शांत न बसता निरंतर काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते.

अशा प्रकारच्या निरंतर प्रयत्नांमधूनच काहीतरी नवीन असे त्यांच्या हाती लागते व तिथूनच खरी अशा व्यक्तींच्या आयुष्याची सुरुवात होत असते. बरेचदा आपण व्यवसायाच्या बाबतीत देखील अशाच  व्यक्तींच्या यशोगाथा बघतो. व्यवसायाची सुरुवात करताना ती अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये केलेली असते व त्यामध्ये निरंतर प्रयत्न व उत्तम नियोजन करून ते व्यवसायाची वेल अगदी गगनापर्यंत पोहोचवतात.

अगदी याच पद्धतीने जर आपण नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर येथील मयुरी ताई छोटूलाल चौधरी यांची यशोगाथा पाहिली तर ती इतर महिलांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.

अगदी दहा हजार रुपये गुंतवणुकीतून व्यवसायाला सुरुवात करून त्यांनी आज मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढवून त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल सुरू केली आहे व इतर हातांना काम देण्याचे महत्वपूर्ण कार्य देखील पार पाडले आहे.

 मयुरी चौधरी यांची यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यात समशेरपुर हे एक छोटेसे गाव असून या ठिकाणी मयुरी चौधरी हे राहतात. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अगदी बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते व ते शहादा येथे त्यांनी पूर्ण केले. लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यांचे समशेरपुर येथील  डॉ. छोटूलाल चौधरी यांच्यासोबत लग्न झाले व त्यांनी एकत्र संसाराला सुरुवात केली.

नंतरच्या कालावधीमध्ये काही वर्ष ते बारडोली येथे त्यांच्या पतीसोबत व्यवसायाच्या निमित्ताने राहिले व त्यानंतर मात्र ते समशेरपुर येथे परतले. उदरनिर्वासाठी मयुरी ताईंनी शिवणकाम सुरू केले व त्यासोबत साडी विणण्याचे काम देखील ते करू लागले. परंतु या सगळ्या कामांमध्ये त्यांचे मन काही रमत नव्हते.

काहीतरी वेगळे करण्याचे मनामध्ये चालू असतानाच त्यांनी सन 2017 मध्ये उमेदच्या माध्यमातून जय अंबे बचत गटाची स्थापना केली व त्या माध्यमातून कुरडया, वाफवलेले गहू आणि मिरची पावडर तयार करायला सुरुवात करून त्या उत्पादनांचे स्टॉल लावायला सुरुवात केली.

तसेच एका वेळी मुंबईला त्यांनी स्टॉल लावला असताना गव्हापासून अनेक वस्तू बनवलेल्या पाहिल्या व अशाच प्रकारे अजून काहीतरी करावं हा विचार त्यांच्या मनात आला व त्यानंतर त्यांनी युट्युब द्वारे वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आता नंदुरबार जिल्हा म्हटलं म्हणजे हा गुजरात राज्याच्या अगदी सीमेलगत असणारा जिल्हा असून त्या ठिकाणाचे अनेक खाद्य संस्कृतीचा प्रभाव आपल्याला या जिल्ह्यावर आढळून येतो.

या सगळ्या गोष्टीतून त्यांना खाकरा  बनवण्याची कल्पना सुचली व दहा हजार रुपये गुंतवणूक करून त्यांनी खाकरे बनवायला सुरुवात केली.

गव्हाच्या पिठापासून तयार होणारा हा एक चविष्ट गुजराती पदार्थ असून  अगदी लवकरच महाराष्ट्रातील खाद्यप्रेमींना देखील तो आवडला. सुरुवातीला अगदी घरगुती स्वरूपामध्ये ते खाकरा बनवायला लागले व त्याची विक्री करून बऱ्यापैकी पैसे मिळवायला लागले.

 अशाप्रकारे झाली सरकारी योजनांची मदत

सुरू केलेल्या या व्यवसायामध्ये काहीतरी वाढ करावी या उद्देशाने त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतले व तिथूनच त्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेची माहिती झाली व त्या माध्यमातून त्यांना एक लाख साठ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली व त्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय वाढीला सुरुवात केली.

तसेच त्यांच्या या व्यवसायाच्या माध्यमातून सविस्तर असलेल्या खाकराची मागणी वाढत गेल्याने आता व्यवसाय वाढीची आवश्यकता भासत होती व यंत्रांच्या माध्यमातून हा व्यवसाय वाढवावा असा निश्चय त्यांनी केला. या ठिकाणी त्यांना कृषी विज्ञान केंद्राची खूप चांगली मदत होऊन त्या ठिकाणी त्यांना टेक्निकल ट्रेनिंग मिळाले.

परंतु यासाठी लागणाऱ्या यंत्रांकरिता मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज होती. तेव्हाही त्यांना शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची मदत झाली व त्यांना दहा लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य मिळाले. या पद्धतीने त्यांनी त्यांच्या गावातील छोट्याशा जागेत अत्याधुनिक यंत्रणा उभारून व्यवसायाची मोठ्या प्रमाणात सुरुवात केली.

आज व्यवसायमध्ये ते स्वतः सगळ्या गोष्टी बघतात व यंत्रांच्या साह्याने मयुरी खाकरा या ब्रँड अंतर्गत पॅकिंग करून मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री देखील करत आहेत.

अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपल्या मनात आलेल्या गोष्टी पूर्णत्वास उतरण्यासाठी झटून त्यांनी सरकारी योजनांची योग्य मदत घेऊन आज त्यांचा स्वतःचा उद्योग सुरु केला व आज ते दिवसातून साडेतीनशे किलो खाकरा बनवून लाखो रुपयांची कमाई तर करतातच व इतर महिलांना रोजगार देखील त्यांनी मिळवून दिलेला आहे.

Ajay Patil