Middle Class In India:- भारतातील समाज मुख्यतः तीन प्रमुख आर्थिक स्तरांमध्ये विभागला जातो. ते म्हणजे उच्चवर्ग, मध्यमवर्ग आणि निम्नवर्ग. यातील मध्यमवर्ग हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. पण मध्यमवर्गाची नेमकी व्याख्या काय आहे? कोणत्या उत्पन्न गटातील लोक या वर्गात मोडतात? आणि या वर्गाचे समाजावर काय परिणाम होतो ? या प्रश्नांची उत्तरे शोधणे तितकेच गरजेचे आहे.
मध्यमवर्ग म्हणजे नेमकं कोण ?
मध्यमवर्ग म्हणजे असा वर्ग जो अत्यंत श्रीमंत नसतो पण पूर्णतः गरीबही नसतो. हा वर्ग आपल्या जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सहज मिळवू शकतो, पण श्रीमंती उपभोगण्यासाठी त्यांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. शिक्षण, स्थिर उत्पन्न आणि चांगल्या जीवनशैलीकडे असलेला कल हे या वर्गाचे प्रमुख लक्षण असते.
मध्यमवर्गीय कुटुंबांचे प्रकार
मध्यमवर्गीय कुटुंबे कोणत्या उत्पन्न गटात मोडतात, हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था आणि अभ्यासांनुसार खालीलप्रमाणे श्रेणी तयार केली जाते….. निम्न मध्यमवर्ग: मासिक उत्पन्न ₹20,000 ते ₹50,000, मध्यम मध्यमवर्ग: मासिक उत्पन्न ₹50,000 ते ₹1,00,00, उच्च मध्यमवर्ग: मासिक उत्पन्न ₹1,00,000 ते ₹2,00,000
या श्रेण्या ठरवताना शहर आणि ग्रामीण भागातील जीवनमानाचा विचार करावा लागतो. महानगरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी खर्च जास्त असतो, त्यामुळे त्यांची उत्पन्न श्रेणी तुलनेने जास्त असते. तर लहान शहरांमध्ये कमी उत्पन्नातही चांगले जीवन जगता येते.
मध्यमवर्गीयांची जीवनशैली कशी असते ?
भारतातील मध्यमवर्गीय लोकांची काही ठराविक वैशिष्ट्ये असतात. ते शिक्षण, नोकरी, घर आणि कुटुंब याकडे विशेष लक्ष देतात. शिक्षणावर भर देतात आणि मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात. स्थिर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळण्यावर भर असतो. सरकारी नोकरी हा अजूनही मध्यमवर्गीयांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे.
स्वतःचे घर असावे अशी या वर्गाची महत्त्वाकांक्षा असते. गृहकर्ज घेऊन घर खरेदी करणे ही त्यांची मुख्य धडपड असते. दुचाकी किंवा चारचाकी वाहन असण्याची शक्यता असते. घरात फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही यांसारख्या अत्यावश्यक सुविधा असतात. बचत आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याकडे कल असतो. ते अचानक खर्च करण्यापेक्षा सुज्ञ गुंतवणूक करणारे असतात.
मध्यमवर्गाचा समाजावरचा प्रभाव
भारतातील मध्यमवर्ग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यांचा उपभोग, गुंतवणूक आणि सेवाक्षेत्रातील सहभाग देशाच्या आर्थिक वाढीस मदत करतो. नवीन व्यवसायांना पाठिंबा देणारा, तंत्रज्ञान स्वीकारणारा आणि सामाजिक बदल घडवणारा हा वर्ग अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
मध्यमवर्ग हा एक प्रकारे देशाच्या लोकशाहीचा आधारही आहे. मतदानाच्या वेळी हा वर्ग आपल्या हक्कांचा योग्य उपयोग करतो आणि योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो.