आर्थिक

मुलाने कॉर्पोरेट क्षेत्रातली उच्च पगाराची नोकरी सोडल्यानंतर माय लेकाने सुरू केला स्टार्टअप! आज आहे 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कमाई

Published by
Ajay Patil

Business Success Story:- जेव्हा मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते तेव्हा त्या इच्छेला पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला काहीतरी कृती करणे गरजेचे असते. जेव्हा आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि जोपर्यंत मनाततली इच्छा किंवा मनातले ध्येय साधले जात नाही तोपर्यंत प्रयत्न करत असतो तेव्हाच माणूस काही कालावधीनंतर यशस्वी होतो. व्यवसायाचे देखील असेच असते.

तुम्हाला जर व्यवसाय उभारायची इच्छा असेल तर त्याकरिता तुम्हाला त्यावर काम करावे लागते व जोपण व्यवसाय तुम्ही सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला अभ्यासपूर्ण अशी माहिती मिळवून त्यावर संशोधन करून मग व्यवसायाला सुरुवात करणे खूप गरजेचे असते. व्यवसाय करणे म्हणजे ते थोडेसे जोखीमयुक्त समजले जाते.

त्यातल्या त्यात चांगल्या पगाराची नोकरी सोडून एखाद्या व्यवसायात पडणे म्हणजे ही खूप मोठी जोखीम असते. परंतु ही जोखीम काहीजण पत्करतात व व्यवसायामध्ये नशीब आजमावतात. परंतु असे व्यक्ती व्यवसाय विकसित करण्यासाठी किंवा व्यवसायाला यशस्वी बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतात व व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवतात.

याच मुद्द्याला धरून जर आपण साहिल जैन या तरुणाची यशोगाथा बघितले तर ती इतर तरुणांना प्रेरणादायी तर आहेच. परंतु एखादा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते? याचे साहिल जैन एक ज्वलंत उदाहरण आहे.

 चार्टर्ड अकाउंटंटची नोकरी सोडून साहिल जैन त्यांच्या आई मीना जैन यांनी सुरू केले स्टार्टअप

याबाबत सविस्तर वृत्त असे की, साहिल जैन कार्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरीला होते व नऊ ते सहा या नोकरीबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी साहिलच्या मनात होती. बऱ्याचदा त्याला कामाचा कालावधी संपून देखील जास्त वेळ कामावर थांबावे लागायचे.

याकरिता साहिलच्या डोक्यात नोकरी सोडावी आणि काहीतरी व्यवसाय करावा हे सुरू होते. शेवटी नोकरीला त्याने रामराम ठोकला व त्यांच्या आई मीना जैन यांच्यासोबत खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला बाजरीचे काही पदार्थ व चिप्स त्यांनी बनवायला घेतले व अशा पद्धतीने व्यवसायाचा श्री गणेशा केला.

 अशा पद्धतीने सुरू केले स्टार्टअप

नोकरी सोडल्यानंतर आईसोबत खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात केल्यानंतर साहिल जैन व त्यांच्या आई मीना जैन यांनी 2018 मध्ये त्यांचे स्टार्टअप सुरू केले. हा व्यवसाय सुरू करण्यामागची त्यांची प्रेरणा किंवा कल्पना जर बघितली तर ती त्यांच्या आईमध्ये सापडते.

कारण साहिल यांच्या आईला अनेक पौष्टिक आणि चविष्ट असे पदार्थ बनवण्याची खूप आवड होती. त्यामुळे साहिलला एके दिवशी वाटले की आईच्या या आवडीचे रूपांतर व्यवसायात का करू नये? त्यानंतर त्याने त्याच्या काही मित्रांना घरी जेवायला बोलवायला सुरुवात केली व मित्रांसाठी साहिलची आई वडापाव यासारख्या पारंपारिक खाद्यांपासून ते हैदराबाद टोस्ट पर्यंत अनेक पदार्थ बनवायची व हा ट्रेंड असे अनेक आठवडे त्यांनी सुरू ठेवला.

त्यानंतर त्यांनी त्यांचा स्टार्टअप मायटी मिलेट्स लॉन्च केले.हळूहळू हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने विस्तारत गेला व आता पुणे, बेंगलोर तसेच दिल्ली आणि मुंबई येथे ताज ग्रुप आणि जेडब्ल्यू मॅरियट सारख्या 50 पेक्षा अधिक हॉटेल्स त्यांचे ग्राहक आहेत. त्यांची ही कंपनी जवळपास 50 पेक्षा जास्त उत्पादने तयार करते.

साहिल जैन यांची कंपनी सध्या भारतातील मोठमोठ्या शहरांमध्ये न्यूट्रिशन बार, ग्रेनोला, कुकीज, वर्मी सेली, नूडल्स तसेच पास्ता, पॅनकेक मिक्स आणि चिप्स यासारखे उत्पादने बनवून त्यांच्या ग्राहकांना पुरवते.

आज ते लाखोची त्या माध्यमातून कमाई करत असून जर त्यांचा मागील वर्षीचा महसूल बघितला तर तो तब्बल पन्नास लाख रुपये पर्यंत पोहोचला असून या आर्थिक वर्षात म्हणजेच 2024 ते 25 मध्ये त्यांच्या या उत्पादनांची विक्री दुप्पट वाढवण्याचे त्यांनी उद्दिष्ट ठेवले असून त्या नुसार ते सध्या काम करत आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil