Gold Price : देशभरात सोने चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरी अर्थात जळगावच्या सराफा बाजारात सोने पुन्हा वधारले असून तोळ्याने ६५ हजार ८०० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे.
२४ कॅरेट सोने प्रतितोळा ६५८०० तर २२ कॅरेटचे सोने ६० हजार २७० रुपये प्रतितोळा दराची गुरुवारी नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने ६५ हजारांचा टप्पा पार केला होता. तर गेल्या ११ महिन्यांत सोन्याचा दर तब्बल ५ हजारांनी वधारला आहे, हे विशेष.
अमेरिकेतील बँकांची स्थिती पाहता सोने-चांदीच्या दरात मोठे बदल होत असून दररोज सोन्याचे दर आता नवीन उच्चांक गाठत आहेत. सध्या अमेरिकेत बँकिंग क्षेत्र अस्थिर मानले जात आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दराने भरारी घेतल्याचे दिसून येत आहे.
११ महिन्यांत ५ हजारांनी वधारले सोने
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सोने प्रतितोळा आता ६० हजार १५० रुपये होते. मे महिन्यात हा दर ६२ हजार १०० रुपयांवर गेला होता. नोव्हेंबर महिन्यात यात पुन्हा वाढ झाली आणि दर ६३ हजार पार गेले.
डिसेंबर ते फेब्रुवारी अखेर हे दर ६४१०० रुपयांपर्यंत राहिले. आता मार्चच्या सुरुवातीलाच सोने ६५ हजारांपार जाऊन दुसऱ्या आठवड्यात ६५ हजार ८०० रुपयांवर पोहोचले.