जीवनामध्ये व्यक्ती जे काही स्वप्न पाहत असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे स्वप्न असते ते म्हणजे स्वतःचे घर असणे हे होय. तेही जर एखाद्या छोट्याशा शहरात असेल तरी उत्तम ठरते. परंतु जर आपण घर खरेदी करणे बघितले तर ते एक प्रचंड खर्चिक अशी बाब असून प्रत्येकाला घर खरेदी करणे शक्य होत नाही.
याकरिता आपल्याला सरकारच्या योजनांची मदत होऊ शकते व अनेक बँकांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या होमलोनचा देखील आधार मिळतो. सरकारच्या योजनांच्या अनुषंगाने बघितले तर केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रधानमंत्री आवास योजना- शहरी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे दिली जातात.
विशेष म्हणजे नुकतेच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 ला मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत सरकार आता शहरी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
काय आहे या योजनेचे स्वरूप?
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबांना येत्या पाच वर्षांमध्ये शहरी भागात राहण्याकरिता पक्की घरे बांधण्यासाठी, घरांच्या खरेदी करिता किंवा भाड्याने देण्यासाठी केंद्रीय सहाय्य देण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून 2.30 लाख कोटींची सरकारी मदत या घरांसाठी देण्यात येणार आहे. तसे पाहायला गेले तर या योजनेची सुरुवात सन 2015 मध्ये झालेली होती व पहिल्या टप्प्यामध्येच देशात 1.18 कोटी घरांना मंजुरी देण्यात आली होती.
त्यापैकी जवळपास 85.5 लाखांपेक्षा अधिकची घरे बांधून पूर्ण झालेली असून ती लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहेत व उर्वरित घरांचे काम सुरू आहे.
कुणाला मिळतो या योजनेचा लाभ?
या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली असून यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्ग अर्थात ईडब्ल्यूएस, निम्न उत्पन्न गट अर्थात एलआयजी, मध्यम उत्पन्न गट अर्थात एमआयजी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. अशी जी कुटुंब आहेत त्यांना देशामध्ये कुठेही स्वतःचे कायमस्वरूपी घर नाही अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून
यासोबतच तीन लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील लोक आर्थिक दुर्बल वर्गात म्हणजेच ईडब्ल्यूएस मध्ये येतात. तीन लाख ते सहा लाख ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे अशी कुटुंबे निम्न उत्पन्न गट म्हणजेच एलआयजी गटामध्ये येतात. तर सहा ते नऊ लाख वार्षिक उत्पन्न असलेले लोक मध्यम उत्पन्न गट अर्थात एमआयजी श्रेणीत येतात.
या योजनेचा कसा मिळतो फायदा?
पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत चार प्रकारे लाभ देण्यात येतो किंवा ही योजना चार प्रकारे लागू करण्यात आलेली आहे. यातील एक मार्ग म्हणजे व्याज अनुदान योजना आहे. व्याज अनुदानाच्या माध्यमातून ईडब्ल्यूएस, निम्न उत्पन्न गट म्हणजेच एलआयजी आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजेच एमआयजी कुटुंबांकरिता गृहकर्जावर सबसिडी उपलब्ध करण्यात आलेली आहे.
याअंतर्गत 25 लाखांपर्यंत होमलोन घेणारे जे काही लाभार्थी आहेत ते बारा वर्षापर्यंतच्या कालावधी करिता पहिल्या आठ लाखांच्या कर्जावर चार टक्के व्याज अनुदानास पात्र आहेत व हा लाभ 35 लाखांपर्यंतच्या घरांसाठी लागू आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना 1.80 लाख अनुदान पाच वर्षे हप्त्यांमध्ये जारी करण्यात येईल असे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.