Penny Stock:- शेअर बाजारात अनेक कंपन्या अल्पावधीत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. यामध्ये काही पेनी शेअर्स देखील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या मुरे ऑर्गनायझर लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरने ५ टक्क्यांचा अपर सर्किट मारत १.८९ रुपयांवर पोहोचला. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्यामुळे हा शेअर चर्चेचा विषय ठरत आहे.
कंपनीचे तिमाही निकाल काय?
मुरे ऑर्गनायझर लिमिटेडच्या शेअरमध्ये आलेली वाढ ही कंपनीच्या तिमाही निकालांमुळे झाली आहे. डिसेंबर २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ३८४.३ टक्क्यांनी वाढून २८१.०४ कोटी रुपये झाला आहे.जो मागील तिमाहीत फक्त ५८.०० कोटी रुपये होता. या भक्कम वाढीमुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या शक्यता अधिक मजबूत झाल्या आहेत.
कंपनीच्या नफ्यात ३४४ टक्क्यांची वाढ
डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३४४.३ टक्क्यांनी वाढून ४.०१ कोटी रुपये झाला, जो सप्टेंबर तिमाहीत फक्त ०.९० कोटी रुपये होता. याशिवाय, करपूर्व नफा (PBT) ३६८.५ टक्क्यांनी वाढून ५.२६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील तिमाहीत १.१२ कोटी रुपये होता.
शेअरच्या किंमतीत चढ-उतार
मुरे ऑर्गनायझर लिमिटेडच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांत मोठे चढ-उतार झाले आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये या शेअरने 52 आठवड्यात ३.०३ रुपयांचा उच्चांक गाठला होता.
मात्र सध्या तो त्या पातळीपेक्षा ३७ टक्के कमी आहे. दुसरीकडे ऑक्टोबर २०२४ मध्ये १.०४ रुपयांवर असलेल्या या शेअरमध्ये ८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे अल्प किंमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.
कंपनीचा व्यवसाय
मुरे ऑर्गनायझर लिमिटेड ही पूर्वी आयरम फार्मास्युटिकल्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत औषध निर्मिती, व्यापार आणि वितरण करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये विविध प्रकारची औषधे समाविष्ट आहेत.
जसे अँटीबायोटिक्स आणि अँटी-मलेरिया औषधे अँटी-एलर्जिक आणि वेदनाशामक औषधे स्त्रीरोग औषधे आणि मल्टीविटामिन्स त्वचारोगासाठी औषधे आणि जंतुनाशक उत्पादने तसेच कंपनीचा HYGNEX+ ब्रँड हा बाजारात प्रसिद्ध असून यामध्ये हात जंतुनाशक, स्प्रे आणि वैद्यकीय उपचारांसाठी विविध उत्पादने उपलब्ध आहेत.