Personal Loan : अचानक जेव्हा मोठ्या पैशांची गरज भासते तेव्हा लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. मात्र, कोणत्याही व्यक्तीने वैयक्तिक कर्जाचा पर्याय शेवटचा ठेवावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण वैयक्तिक कर्ज हे अत्यंत महाग असते. जर तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही आधी कर्जाच्या व्याजदराबद्दल माहिती काढणे गरजेचे आहे.
पूर्ण माहिती घेऊनच अर्ज करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. आज आम्ही पाच सरकारी बँकांकडून एक लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला किती व्याज भरावा लागेल, सांगणार आहोत. चला तर मग…
युनियन बँक ऑफ इंडिया
तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियाकडून 1 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि 0.50 टक्क्यांपर्यंत जीएसटी भरावा लागेल. मात्र, महिला व्यावसायिकांसाठी ते शून्य आहे. ही बँक 9.30 ते 13.40 टक्के व्याज आकारत आहे. यामध्ये पाच वर्षांसाठी 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर 2090 रुपयांपासून 2296 रुपयांपर्यंत EMI भरावा लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक सध्या 31 जानेवारी 2024 पर्यंत वैयक्तिक कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क आकारत नाही. तुम्हाला एसबीआयकडून वैयक्तिक कर्जावर 11.15 टक्के ते 14.30 टक्के व्याज द्यावे लागेल. यानुसार, 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी तुमचा EMI 2182 ते 2342 रुपयांपर्यंत असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र सध्या वैयक्तिक कर्जावर 10 ते 12.80 टक्के व्याज आकारत आहे. ही बँक सध्या या कर्जावरील रकमेवर एक टक्के जीएसटी प्रक्रिया शुल्क आकारत आहे. या बँकेकडून 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी, भरावा लागणारा EMI 2125 ते 2265 रुपयांपर्यंत असू शकतो.
इंडियन बँक
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक देखील वैयक्तिक कर्जावरील कर्जाच्या रकमेच्या एक टक्के प्रक्रिया शुल्क आकारत आहे. Livemint च्या बातमीनुसार, सरकारी कर्मचारी किंवा PSU कर्मचाऱ्यांना कोणतीही प्रोसेसिंग फी भरावी लागत नाही. यामुळे 1 लाख रुपयांच्या कर्जावरील तुमचा EMI फक्त 2125 ते 2194 रुपयांच्या दरम्यान असेल.
पंजाब आणि सिंध बँक
तुम्हाला पंजाब आणि सिंध बँकेतील वैयक्तिक कर्जावर प्रक्रिया शुल्क म्हणून 0.50 टक्के ते 1 टक्के जीएसटी भरावा लागेल. तुम्ही या बँकेत 1 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास, EMI 2132 ते 2265 रुपयांच्या दरम्यान असेल.