आर्थिक

PhonePe ने लॉन्च केला फक्त 59 रुपयांमध्ये मलेरिया व डेंग्यूसाठी स्वस्त विमा! कसा मिळू शकतो तुम्हाला फायदा?

Published by
Ajay Patil

Health Insurance By PhonePe:- जीवनामध्ये कधी कुणाला आरोग्याची कुठली समस्या उद्भवेल आणि त्यानंतर हॉस्पिटलसाठी किती खर्च करावा लागेल याबाबत कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते. अशा प्रकारची परिस्थिती जर जीवनामध्ये उद्भवली तर मात्र मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो व अशावेळी मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना देखील करावा लागतो.

या समस्येवर एक नामी उपाय जर आपण बघितला तर तो म्हणजे आरोग्य विमा होय. परंतु अनेक आरोग्य विम्याचे प्रीमियम म्हणजेच हप्ते हे जास्त असल्याने सामान्य नागरिकांना आरोग्य विमा घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा प्रसंगी मात्र जर आरोग्याचा प्रश्न उद्भवला तर खूप मोठी आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते.

या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण एक दिलासादायक बाब बघितली तर फोन पे च्या माध्यमातून मंगळवारी डेंग्यू आणि मलेरियासाठी एक नवीन आणि परवडणारी स्वस्तातली विमा योजना लॉन्च करण्यात आलेली आहे. ही विमा योजना अतिशय स्वस्त असून वर्षाला फक्त 59 रुपये याकरिता भरावे लागणार आहेत.

फोन पे च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही आरोग्य विमा योजना डेंग्यू, मलेरिया आणि इतर हवेतून आणि डासांपासून पसरणारे आजारांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण देईल. खास करून टीयर-2 आणि टीयर-3 शहरांमध्ये राहणारे लोक या विम्याच्या माध्यमातून कुठलाही अनपेक्षितपणे उद्भवणारा वैद्यकीय खर्च टाळू शकणार आहेत.

कसे आहे या विमा योजनेचे स्वरूप?
फोन पेने लॉन्च केलेल्या या विमा योजनेत मलेरिया, डेंग्यू तसेच चिकनगुनिया, फायलेरियायसिस, बर्ड फ्लू तसेच स्वाइन फ्लू, टायफाईड, मेंदूज्वर आणि फुफ्फुसीय क्षयरोग यासारख्या इतर 10 पेक्षा अधिक आजारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या विम्याच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे म्हणजेच हॉस्पिटलयझेशन,

आवश्यक चाचण्या आणि आयसीयू मधील उपचारांचा खर्च देखील समाविष्ट करण्यात आला असून ही योजना तुम्हाला वर्षभर विम्याचे संरक्षण प्रदान करेल. फोन पे वापरणारे कधीही या विम्याचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हाला जर हा आरोग्य विमा किंवा हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही फोन पे ॲपवरून ताबडतोब खरेदी करू शकतात तसेच व्यवस्थापित आणि त्याचा दावा देखील करू शकतात.

ही सगळी प्रक्रिया 100% डिजिटल असल्यामुळे दावे जलद आणि सहजपणे सोडवले जातील. ज्या व्यक्तींकडे आधीच कार्पोरेट आरोग्य विमा आहे ते देखील अतिरिक्त संरक्षणासाठी फोन पे च्या या विम्याचा लाभ घेऊ शकतात.

फोन पे वरून कसा घेता येईल हा आरोग्य विमा?
फोन पे च्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेली ही आरोग्य विमा योजना घ्यायची असेल तर फोन पे ॲपवरील विमा विभागात जाऊन डेंग्यू आणि मलेरिया पर्याय निवडून तुम्ही खरेदी करू शकतात.

यामध्ये तुम्हाला या योजनेचा तपशील तसंच विम्याची रक्कम आणि प्रीमियम इत्यादीबद्दल सर्व माहिती पाहता येईल. यामध्ये तुम्ही पॉलिसीधारकांची माहिती भरून आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून काही मिनिटात विमा मिळवू शकतात.

Ajay Patil