Poultry Business:- गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा फार मोठा फटका बसत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्जरुपाने पैसा उभा करून शेतकरी शेतीमध्ये पैसा टाकतो.परंतु जेव्हा हातात उत्पादन येईल अगदी त्याच वेळेस गारपीट तसेच वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेतीच्या खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर हा वाढत जातो.
या समस्येवर रामबाण उपाय पाहिला तर तो म्हणजे शेतीवरच अवलंबून न राहता त्याला सोबत म्हणून काहीतरी व्यवसाय करणे हे काळाची गरज आहे व हीच गरज ओळखून अकोला जिल्ह्यातील शिर्ला अंधारी या गावातील एका शेतकरी दांपत्याने गावरान कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला व त्या माध्यमातून यशाचे शिखर गाठले आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
गावरान कोंबडीपालनातून गाठले यशाचे शिखर
त्याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात असलेल्या शिर्ला अंधारे या गावाचे रहिवासी असलेले गजानन अंधारे व त्यांच्या पत्नी प्राजक्ता अंधारे यांनी 11 महिन्यांपूर्वी देशी कोंबडी पालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून सुरू केला व या माध्यमातून आज त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर वार्षिक उलाढाल केलेली आहे.
हा व्यवसाय निवडण्यामागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे इतर शेतकऱ्यांप्रमाणे भाजीपाला तसेच इतर पिके घेणारे गजानन अंधारे यांना देखील नैसर्गिक आपत्तींचा फार मोठा फटका बसलेला होता व खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. पुढे या व्यतिरिक्त शेतीला काहीतरी जोडधंदा असावा या उद्देशाने त्यांनी गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कारण हा व्यवसाय करणे त्यांच्यासाठी सोपे होते कारण त्यांनी 1997 मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पोल्ट्री फार्म व्यवसायाची ट्रेनिंग घेतलेले होते व याचाच उपयोग त्यांनी कोंबडी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी करायचं ठरवले व हा व्यवसाय सुरू केला. याकरिता कृषी विभागाच्या आत्माचे अधिकाऱ्यांचे आणि तज्ञांची त्यांनी मार्गदर्शन घेतले व अर्धा एकर मध्ये शेड उभारले. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी 28 हजार रुपयांचा खर्च केला व एक हजार देशी कोंबड्यांचे पिल्ले आणले व त्यांच्या संगोपन करायला सुरुवात केली.
यामध्ये एका कोंबडीला त्यांना 35 ते 40 रुपये संगोपनासाठी खर्च आला. 1000 कोंबड्यांपैकी चारशे कोंबड्या त्यांनी एक ते सव्वा किलो वजन झाल्यानंतर विकल्यावर त्यातुन त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले व त्यांचा आत्मविश्वास दुणावला. कारण या मधून त्यांना जवळपास एक लाख रुपयांचा नफा मिळाला. आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांनी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून देशी कोंबड्यांपासून अंडी उत्पादनाला सुरुवात केली असून स्वतःचा VLA म्हणजेच व्हिलेज लाईफ एग्स ब्रँड तयार केला.
या ब्रँडच्या खाली गावरान अंड्याची विक्री त्यांनी सुरू केली व आज संपूर्ण अकोला जिल्हामध्ये त्यांच्या अंड्यांची मागणी चांगली आहे. आज त्यांच्याकडे पाचशे गावरान कोंबड्या असून त्यापासून दीडशे ते दोनशे अंडीचे उत्पादन मिळते. तर गावात ही अंडी त्यांनी विकली व हळूहळू या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी एक युक्ती लढवली व अंड्याच्या पॅकिंग करण्यासाठी नागपूरहून पुठ्ठ्यांचे पॅकिंग बॉक्स तयार करून घेतले व यामध्ये तब्बल सहा अंडी व्यवस्थित बसतात व त्या बॉक्स प्रमाणे ते आता विक्री करतात.
ते प्रामुख्याने अंड्यांची विक्री ही पातुर तसेच अकोला, वाडेगाव, बाळापुर, कापशी, बार्शीटाकळी तसेच पिंजर व इतर ठिकाणी करतात आणि या पॅकिंग बॉक्समध्ये सहा अंडी मावतात व त्याची किंमत व बाजारामध्ये 80 ते 90 रुपये प्रमाणे ते विक्री करतात. बाजारामध्ये तर हे सहा अंड्यांची पॅकिंग 100 ते 120 रुपया पर्यंत ते विकतात.
दररोज 150 ते 160 याप्रमाणे अंड्यांची विक्री होते व महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयापर्यंत उलाढाल ते करतात व खर्च वजा जाता यातून महिन्याला 40 ते 45 हजार रुपये नफा हाती राहतो असे त्यांनी सांगितले. या देशी कोंबड्यांसाठी प्रत्येक महिन्याला 25 ते 30 हजार रुपये खाद्यावर खर्च होतो असे देखील त्यांनी सांगितले.
येणाऱ्या दिवसांमध्ये गावरान कोंबडी संगोपनाचा व्यवसाय विस्तार करण्याचा त्यांचा विचार असून गावरान कोंबड्यांची संख्या चार हजारापर्यंत वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. गावरान कोंबड्यांना व अड्यांना मिळणारा दर व त्यासाठी लागणारा खर्च यांचे जर गणित पाहिले तर या व्यवसायातून जास्तीचे पैसे मिळतात असे त्यांनी आवर्जून सांगितले.
अशा पद्धतीने अंधारे या शेतकरी दांपत्याने शेतीमध्ये होणारे नुकसान पाहून जोड व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला व तो निर्णय आज फायद्याचा ठरल्याचे दिसून येत आहे.