आर्थिक

Poultry Farming: कुक्कुटपालनातून महिन्याला हा तरुण कमवतो 80 हजार ते 1 लाख! वाचा कशा पद्धतीचे आहे पोल्ट्रीचे नियोजन?

Published by
Ajay Patil

Poultry Farming:- शेती करत असताना आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीला जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे. जोडधंद्यांच्या बाबतीत पाहिले तर अनेक प्रकारचे व्यवसाय सध्या शेतकरी करतात. पशुपालन सारखा व्यवसाय तर फार पूर्वीपासून शेतकरी करत आलेले आहेत.

परंतु त्या व्यतिरिक्त कुक्कुटपालन आणि शेळीपालना सारखे जोडधंदयामध्ये देखील आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी हे व्यवसाय करतात. यात पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय पहिला तर तो आता व्यावसायिक  दृष्टिकोनातून केला जात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जोडधंद्यासाठी याची निवड केली असून यामध्ये तरुण शेतकरी पुढे आहेत.

वेगवेगळ्या प्रकारच्या संकरित जाती विकसित झाल्यामुळे पोल्ट्री फार्मिंग आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा व्यवसाय ठरताना दिसून येत आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथील निलेश काकडे या तरुण शेतकऱ्यांचा विचार केला तर या तरुण शेतकऱ्याने 2016 मध्ये कुकुट पालनाचा व्यवसाय सुरू केला व या माध्यमातून तो आज खूप मोठ्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवत आहे. याचा तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 कुक्कुटपालनातून आर्थिक प्रगती

धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथील निलेश काकडे शेतीला जोडधंदा करावा म्हणून व्यवसायाची चाचपणी करत असताना निलेश काकडे यांचे मित्र महमूद शेख यांनी त्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. जेव्हा त्यांनी 2016 मध्ये व्यवसाय सुरू केला तेव्हा डीपी क्रॅश जातीचे 140 पिल्ले  विकत आणून व्यवसायला सुरुवात केली.

आजमीतिला त्यांच्याकडे या जातीच्या दीड हजार कोंबड्या आहेत. निलेश यांची घरची साडेआठ एकर शेती असून त्यामध्ये ते ऊस लागवड करतात. या उसाला त्यांनी कोंबडी खताचा वापर केल्यामुळे उसाच्या उत्पन्नामध्ये देखील चांगली वाढ झाल्याचे त्यांना दिसून आले.

कोंबडी खताचा ऊसाला जास्त फायदा होत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेडमध्ये कोंबड्या वाढवल्या. यामध्ये त्यांनी नगर आणि पुणे येथून एक दिवसांची गावरान कोंबड्यांची 1500 पिले वीस रुपये प्रति नग याप्रमाणे विकत आणली. लसीकरण व खाद्यासारख्या गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष देऊन 60 दिवसांचे जेव्हा पिल्ले होतात तेव्हा ते विक्रीसाठी तयार होत असतात.

जेव्हा हे पिल्लं विक्रीसाठी तयार होतात तेव्हा ते महाराष्ट्र आणि राज्य बाहेर विक्रीसाठी पाठवले जातात. विशेष म्हणजे जागेवरच 180 रुपयाचा दर या कोंबड्यांना मिळत आहे. यामध्ये त्यांच्या शेड मधील कोंबड्यांची माहिती ते मोबाईलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना देत असतात

व त्या आधारेच व्यापारी त्या कोंबड्यांचे दर ठरवून जागेवर येऊन कोंबड्या विकत घेतात. या सगळ्या नियोजनातून त्यांना 60 दिवसांमध्ये 80 ते 1 लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळतो. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोंबडी खत मिळाल्यामुळे त्याचा शेतात वापर करता आला व इतर पिकांचे उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.

अशा पद्धतीने पाहिले तर छोटासा व्यवसाय सुरू करून जर व्यवस्थित नियोजन केले तर व्यक्ती त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवू शकतो हे निलेश यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.

Ajay Patil