Pm Surya Gruh Yojana : सध्या पंतप्रधान सूर्यघर योजनेची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांकडून या योजनेबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण केंद्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली पंतप्रधान सूर्य घर योजना नेमकी कशी आहे याबाबत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे पंतप्रधान सूर्य घर योजना
केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनलचा लाभ दिला जाणार आहे. देशातील एक कोटी घरांवर सोलर रुफ टॉप बसवले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून तब्बल 75 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरावर क्षमतेनुसार एक किलो वॅट सोलर पॅनल पासून ते दहा किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. यासाठी शासनाकडून अनुदानही मिळणार आहे. मात्र या योजनेचा लाभ फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना घेता येणार नाही. तसेच जे लोक भाडेकरू आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही.
ज्या लोकांचे स्वतःचे घर आहे आणि 130 स्क्वेअर फुट पासून ते 1,000 स्क्वेअर फूट पर्यंतचे छत आहे, अशाच लोकांना या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवता येणार आहे. दरम्यान, आता आपण किती किलोवॅट सोलर पॅनलसाठी किती अनुदान मिळणार आणि वीजबिलानुसार तुमच्या घरासाठी किती किलो वॅटचे सोलर पॅनल पुरेसे ठरेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तुम्ही किती किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले पाहिजे
पीएम सूर्यघर योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सोलर रूफ टॉप कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 500 रुपयांपर्यंत विज बिल येत असेल तर तुम्हाला एक किलोवॅटचे सोलर पॅनल पुरेसे ठरणार आहे. आता आपण एक किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून किती अनुदान उपलब्ध होते आणि यासाठी किती खर्च करावा लागतो? याबाबतची माहिती पाहणार आहोत.
1 KW सोलर पॅनल साठी किती खर्च करावा लागतो
पीएम सूर्यघर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार एक किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 47 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. यामध्ये ग्राहकाला 18000 रुपयांची सबसिडी या पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. अर्थातच ग्राहकाला एक किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी स्वतःचे 29 हजार रुपये ॲड करावे लागतात.
सोलर पॅनलची लाईफ किती असते
सोलर पॅनलची लाईफ 25 वर्षांपर्यंत असते. म्हणजेच एकदा खर्च केल्यानंतर 25 वर्षांपर्यंत वीज वापरता येणार आहे. दरम्यान, सोलर पॅनलसाठी आलेला खर्च विज बिल वाचवून अवघ्या 5.95 वर्षाच्या कालावधीतच वसूल करता येणार आहे.
पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज कसा करणार?
https://pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक नागरिकांना सोलर पॅनल साठी अर्ज करता येणार आहे. यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर अप्लाय फॉर रूफ टॉप सोलर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे.
रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन करायचे आहे आणि मग या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर मग पुढची प्रोसेस पूर्ण होईल आणि पात्र लोकांना सोलर पॅनलसाठी अनुदान मिळणार आहे.