Property Selling Tips:- गुंतवणूक ही भविष्यात आपल्याला मिळणारा आर्थिक फायदा यामुळे प्रामुख्याने केली जाते व गुंतवणूक करताना जास्तीत जास्त पैसा भविष्यात आपल्याला गुंतवणुकीतून मिळावा ही अपेक्षा असते. अशीच अपेक्षा रियल इस्टेटमध्ये म्हणजेच प्रॉपर्टी विकत घेताना प्रत्येकाला असते.
प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना भविष्यात त्या प्रॉपर्टीच्या विक्रीतून आपल्याला मोठा नफा मिळेल या उद्दिष्टाने गुंतवणूक केली जात असते. साधारणपणे रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल
तर कमी किमतीमध्ये एखादी प्रॉपर्टी विकत घेऊन कालांतराने तिच्या किमतीत वाढ झाल्यास त्या विक्रीतून चांगला नफा मिळवायचा हा एक उद्देश आपल्याला दिसून येतो. परंतु हा उद्देश तुम्हाला साध्य करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला काही गोष्टी पाळणे खूप गरजेचे असते. जेणेकरून प्रॉपर्टी विक्रीतून जास्त नफा भविष्यात मिळू शकते.
प्रॉपर्टी विक्रीतून अधिकचा पैसा मिळवायचा असेल तर या गोष्टी पाळा
1- प्रॉपर्टीचे मूल्य योग्य पद्धतीने निश्चित करा– जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी मार्केटमध्ये विक्रीचा विचार करत असतात तेव्हा तुम्हाला कोणत्या किमतीमध्ये ती विकायची आहे हे अगोदर निश्चित करा. तुमची प्रॉपर्टी ज्या भागांमध्ये आहे त्या भागामध्ये मागील दोन-तीन महिन्यात किती किमतीमध्ये प्रॉपर्टीची विक्री झाली आहे याची माहिती मिळवा.
जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी ची किंमत निश्चित करण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर तुमच्या मालमत्तेचे स्थान किंवा ठिकाण तसेच तिचा आकार, फिनिशिंग आणि इतर सुविधा लक्षात घेऊन किंमत ठरवा.
जेव्हा तुम्ही किंमत निश्चित करता त्यानंतर प्रॉपर्टी विक्रीसाठी उतरवताना काही अतिरिक्त किंमत सांगा व जेणेकरून त्या किमतीत वाटाघाटी करून तुम्हाला समोरच्याला काही सूट देता येईल आणि तुम्हाला हवी असलेली किंमत देखील तुम्हाला मिळेल.
2- कागदपत्रे व्यवस्थित सांभाळून ठेवा– प्रॉपर्टी विक्रीचा जेव्हा तुम्ही निर्णय घेता आणि किंमत निश्चित केल्यानंतर त्या प्रॉपर्टी संबंधी महत्त्वाचे कागदपत्रे जसे की, कन्वेयन्स डिड, बुकिंग पावती तसेच मागणी पत्र, वीज, पाणी आणि टेलिफोनचे बिल तसेच प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्या यासारख्या कागदपत्रांच्या फोटो प्रतिंची एक फाईल तयार करून ठेवावी व ती व्यवस्थित सांभाळून ठेवावी.
प्रॉपर्टीला ग्राहक मिळाल्यानंतर त्याला आवश्यक कागदपत्रे तुम्हाला वेळेला दाखवता येतील.या सगळ्या गोष्टींमधून तुमची व्यावसायिक वृत्ती दिसून येते व तुम्हाला प्रॉपर्टी विकण्यामध्ये किती रस आहे हे देखील ग्राहकाला समजते.
3- प्रॉपर्टीची व्यवस्थित देखभाल करा– प्रॉपर्टी विक्रीसाठी मार्केटमध्ये उतरवताना प्रॉपर्टीचे जर काही नुकसान झालेले असेल तर तिची दुरुस्ती करून घेतलेली बरे. तसेच त्याला रंग लावण्याची गरज असेल तर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता रंग लावून घेणे गरजेचे आहे.
तसेच विक्रीपूर्वी घराच्या आजूबाजूची स्वच्छता आणि हिरवळीकडे लक्ष द्यावे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास पहिल्या नजरेमध्ये ग्राहकांना मालमत्ता आवडण्याची शक्यता वाढते व मागितलेल्या किमतीत ग्राहक मालमत्ता खरेदी करायला तयार होतात. त्यामुळे प्रॉपर्टीची देखभाल व्यवस्थित पद्धतीने केलेली असणे गरजेचे आहे.
4- प्रॉपर्टी विकण्यासाठी मदत घेणे– प्रॉपर्टी चांगल्या किमतीत विकण्याकरिता तुम्ही तुमच्या परिसरातील प्रॉपर्टी डीलरची मदत घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला त्यांना काही पैसे कमिशन स्वरूपामध्ये द्यावे लागतात. साधारणपणे प्रॉपर्टी डीलर्स विक्रीवर एक ते दोन टक्क्यांचे कमिशन घेतात.
दुसरे म्हणजे तुम्ही ऑनलाइन माध्यमांचा वापर करून देखील प्रॉपर्टी चांगल्या किमतीत विकू शकतात. कारण या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन रिअल इस्टेटच्या अनेक वेबसाईट आहेत व त्या ठिकाणी कमी काळातच प्रॉपर्टी लिस्ट करून चांगल्या किमतीत विक्री करता येऊ शकते.