आर्थिक

Education Loan: शिक्षणासाठी बँक देतील 10 ते 15 लाखापर्यंत कर्ज; वाचा एज्युकेशन लोन संबंधी ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

Education Loan:- आजकाल जर आपण पाहिले तर उच्च शिक्षणाचा खर्च हा काही लाखो रुपयांमध्ये असून प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण घेणे पैशामुळे शक्य होत नाही. अगदी पाच ते दहा लाखापर्यंत देखील शिक्षणाचा खर्च आता झाल्यामुळे सर्वच मुलांना शिक्षण घेता येईल असे होत नाही. त्यामुळे बरेच होतकरू आणि हुशार विद्यार्थी हे पैशांभावी मागे पडतात व त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते.

अशावेळी ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल असे विद्यार्थी बँकांच्या माध्यमातून कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करू शकतात व स्वतःचे करिअर सेट करू शकतात.  परंतु नेमके हे एज्युकेशन लोन काय असते व त्यासाठी काय पात्रता लागते? इत्यादी संबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेऊ.

 एज्युकेशन लोन म्हणजे नेमके काय?

ज्या विद्यार्थ्यांना पुरेसा पैसा नसल्यामुळे उच्च शिक्षण घेणे कठीण होते असे विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी बँकांच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात. बँकांच्या माध्यमातून देण्यात येणारे हे कर्ज भारतात आणि भारताबाहेर शिक्षणासाठी कामी येते. या कर्जाच्या माध्यमातून हॉस्टेलची फी तसेच ट्युशन फी, अभ्यासक्रमांच्या संबंधित असलेली उपकरणे आणि इतर खर्च देखील यामध्ये देण्यात येतो.

एवढेच नाही तर तुम्हाला जर विदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर काही बँकांच्या माध्यमातून विमानाचा तिकिटांचा खर्च देखील या कर्जामध्ये समाविष्ट करून देण्यात येतो. विद्यार्थी हे शिक्षण घेणारे असल्यामुळे त्यांचा सिबिल स्कोर वगैरे या गोष्टी नसतात. अशा वेळेला मात्र विद्यार्थ्यांचे पालक किंवा गार्डियन सह कर्जदार म्हणून सही करू शकतात किंवा काही बँक तारण म्हणून प्रॉपर्टीची कागदपत्रे किंवा मुदत ठेवींचे सर्टिफिकेट इत्यादींची मागणी करू शकता.

 कोणाला मिळते एज्युकेशन लोन?

1- प्रत्येक भारतीय एज्युकेशन लोन साठी अर्ज करू शकतो.

2- अर्जदाराने देशांतर्गत किंवा परदेशातील शिक्षण संस्थेमध्ये निश्चित प्रवेश घेतलेला असावा व त्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहते.

3- एज्युकेशन लोनसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय किमान 15 ते कमाल 35 वर्ष असणे गरजेचे आहे.

4- अर्जदार विद्यार्थ्यासोबत सह अर्जदार म्हणून विद्यार्थ्यांचे पालक किंवा गार्डीअनने हमी देणे गरजेचे आहे.

5- जर चार लाखापेक्षा जास्त लोन घ्यायचे असेल तर तारण म्हणून मुदत ठेव सर्टिफिकेट किंवा प्रॉपर्टीचे कागदपत्र तारण म्हणून ठेवावे लागतात.

 एज्युकेशन लोन साठी बँक कुठली कागदपत्रे मागू शकते?

1- शिक्षणाकरिता ऍडमिशन घेतल्याचे सर्टिफिकेट व त्यासोबतच स्कॉलरशिप लागू असेल तर त्याचे प्रमाणपत्र

2- संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क कसे आहे त्याचे स्ट्रक्चर

3- विदेशात शिक्षणासाठी जायचे असेल तर स्टुडन्ट व्हिसा आणि फॉरेन एक्सचेंज परमिट

4- मागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट

5- वयाचा दाखला

6- पत्त्याचा पुरावा

7- दोन पासपोर्ट साईज फोटो

8- चार लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर तारण कागदपत्रे

कोणत्या अभ्यासक्रमांसाठी एज्युकेशन लोन मिळते?

एज्युकेशन लोन हे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने मान्यता दिलेल्या भारतातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमान करिता मिळते व त्यासोबतच विदेशातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी देखील बँकांच्या माध्यमातून कर्ज देण्यात येते. या प्रकारचे कर्ज देणाऱ्या ज्या बँका असतात त्यांच्याकडे भारतातील आणि भारताबाहेरील शैक्षणिक संस्थांची यादी असते या यादीतील संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते कर्ज देत असतात.

 किती कर्ज मिळू शकते?

विद्यार्थ्यांना जर भारतातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर बऱ्याच बँकांच्या माध्यमातून दहा ते पंधरा लाखापर्यंत कर्ज मिळते तर परदेशातील शिक्षणाकरिता 20 ते 30 लाखापर्यंत कर्ज मिळतो. याहीपेक्षा जास्त कर्ज हवे असेल तर बँकेकडे काही तारण ठेवल्यास जास्त कर्ज मिळू शकतो.

 किती असतो या कर्जाचा कालावधी?

भारतातील बँकांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या एज्युकेशन लोनचा सरासरी कालावधी हा पाच ते सात वर्षांसाठी असतो. परंतु काही बँक दहा ते पंधरा वर्षांसाठी देखील कर्ज देतात. परंतु याकरता मात्र जास्त व्याजदर आकारतात.

 एज्युकेशन लोनमध्ये कोणता खर्च दिला जातो?

यामध्ये ट्युशन फी आणि हॉस्टेलची फी, परीक्षा फी, लायब्ररी फी आणि लॅब फी, विद्यापीठाला/ शैक्षणिक संस्थेला दिलेले रिफंडेबल डिपॉझिट, पुस्तके, युनिफॉर्म आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्च व प्रवासाचा खर्च( यामध्ये विमानाच्या परतीचा प्रवास) इत्यादी खर्चाचा समावेश यामध्ये होतो.

Ajay Patil