आर्थिक

कबीरजीत सिंहचा झाला बर्गरसिंह! आज त्यांच्या ब्रँडचे आउटलेट दिल्लीपासून पसरले आहेत लंडनपर्यंत

Published by
Ajay Patil

बरेच व्यक्ती आपल्या प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने एखादी गोष्ट खूप उंचीवर नेऊन पोहोचवतात. यामागे त्यांचे कष्ट, ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीची धडपड हे गुण कारणीभूत ठरतात. बरेच व्यक्ती एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत खूप मोठी भरारी घेतात व यश मिळवून आणतात. बऱ्याचदा अशा व्यवसायाची कल्पना त्यांना अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून आलेली असते व अशा छोट्या कल्पनेला मोठ्या स्वरूपात विस्तारण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात मेहनत घेतात व यशस्वी होतात.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण कबीरजीत सिंग यांचे उदाहरण घेतले तर त्यांना आता बर्गर सिंह म्हणून ओळखले जाते व हे नाव भारतापासून ते थेट ब्रिटन पर्यंत प्रसिद्ध आहे. नेमके या व्यक्तीने असा कुठला व्यवसाय केला की त्या व्यवसायाने या व्यक्तीला त्याची नवीन ओळख निर्माण करून दिली.

 कबीरजीत सिंह ते बर्गर सिंह असा प्रवास

कुठल्याही क्षेत्रांमध्ये मेहनत आणि समर्पण या दोन गोष्टींमुळे खूप मोठे यश मिळवता येते. हे आपल्याला कबीरजीत सिंग यांच्या उदाहरणाने दिसून येते. कबीर यांना बर्गर सिंह म्हणून देखील ओळखले जाते व या नावाने ते थेट भारतापासून ते ब्रिटन पर्यंत खूप प्रसिद्ध आहेत. बर्गर सिंग हे कबीरजीत सिंह यांच्या रेस्टॉरंट चे नाव असून  रेस्टॉरंटची पायाभरणी किंवा निर्मितीची कहाणी ही ब्रिटन पासून सुरू होते.

भारत किंवा ब्रिटन इथेच न थांबता त्यांनी आता जगातील अनेक देशांमध्ये त्यांचा ब्रँड प्रसिद्ध करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. जर आपण आज जगाचा किंवा भारताचा विचार केला तर बर्गरचे अनेक ब्रँड आहेत व त्यातल्या त्यात भारतीय ब्रँड खूपच कमी आहेत.

या स्थितीमध्ये कबीरजीत सिंग यांनी भारतातच नव्हे तर लंडनमध्ये देखील आपल्या बर्गरच्या अनोख्या चवीने खूप मोठे नाव बनवले आहे. जर आपण कबीरजीत सिंह अर्थात बर्गर सिंह यांची यशोगाथा पाहिली तर एके काळी बर्गर कंपनीमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीने आज शंभर पेक्षा जास्त आउटलेट उभे केले आहेत.

 कबीरजीत सिंह यांचा जन्मापासून प्रवास

कबीरजीत सिंग यांचा जन्म एका लष्करी कुटुंबामध्ये झाला व प्रत्येक वडिलांप्रमाणे कबीर ने देखील सैन्यात भरती व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. परंतु कबीर यांच्या मनामध्ये काहीतरी नवीन करावे अशी इच्छा होती व पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही वेळ नोकरी केली व पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनला रवाना झाले. ब्रिटन येथे 2007 मध्ये बर्मिगहॅम बिझनेस स्कूल मध्ये जेव्हा ते एमबीए पूर्ण करत होते तेव्हा त्यांना उदरनिर्वाह करणे देखील खूप कठीण गेले.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी सकाळच्या क्लास नंतर रात्रीच्या शिफ्टमध्ये एका बर्गर आऊटलेटवर काम करायला सुरुवात केली.  या बर्गर कंपनीमध्ये काम करत असताना जेव्हा पूर्ण काम व्हायचे तेव्हा कबीर यांना बर्गर खायला दिले जायचे. या ठिकाणी मसाला नसलेला बर्गर त्यांना खायला मिळायचा व तो त्यांना आवडला नाही.

याच गोष्टीतून शिकत त्यांनी भारतीय पदार्थांचा वापर करून बर्गर बनवायला सुरुवात केली व त्यांच्यासोबत काम करणारे जे काही लोक होते त्यांना तो बर्गर खूप आवडला. त्यानंतर पुढे सुट्टीच्या कालावधीत किंवा वीकेंडला त्या ठिकाणच्या बर्गर कंपनीच्या मालकाने मेनूमध्ये कबीरचा बर्गरचा देखील समावेश करण्याचे ठरवले व हळूहळू ब्रिटन मधील लोकांना देखील कबीरचा बर्गर खूप आवडू लागला व त्यामुळे कबीर यांना प्रसिद्धी मिळाली.

हे प्रसिद्धी एवढी मिळाली की ब्रिटन मधील लोक त्यांना कबीरजीत ऐवजी बर्गर सिंग म्हणू लागले. काही वर्षे त्या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचे ठरवले व बर्गर सिंग या नावाने स्वतःचा व्यवसाय उभा करायचे ठरवले व 2014 मध्ये त्यांनी 15 लाख रुपयांचे भांडवल गुंतवले व बर्गर सिंग रेस्टॉरंट सुरू केले. 2014 मध्ये सुरू झालेले आहे या ब्रँडचे आज १०० पेक्षा जास्त आउटलेट असून 14 राज्यांमध्ये हे आउटलेट उभारण्यात आलेले आहेत व या माध्यमातून 60 कोटी रुपयांचा व्यवसाय त्यांनी केला आहे.

या दरम्यान त्यांनी त्यांचा जुना शाळेतील जो काही सवंगडी नितीन राणा यांना देखील कामासाठी बोलावले व 2003 पासून पिझ्झा हटमध्ये नितीन राणा यांना कामाचा अनुभव होता व या मोठ्या प्रमाणात असलेल्या अनुभवाचा फायदा बर्गर सिंगला त्यांच्या व्यवसायात झाला.

आज जर आपण पाहिले तर बर्गर सिंगचे आउटलेट हे दिल्ली, नागपूर तसेच लंडन पर्यंत पसरलेले आहेत. एवढेच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये त्यांना त्यांचा व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. ब्रिटनमध्ये तर त्यांनी त्यांच्या बर्गरची चव प्रसिद्ध केली आहेच परंतु त्यांना आता त्यांचा व्यवसायाचा विस्तार अमेरिकेत आणि अमेरिकेत जे काही भारतीय स्थायिक झालेले आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी करायचा आहे.

यावरून आपल्याला दिसून येते की माणसाची इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी राहिली तर माणूस कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो.

Ajay Patil