Insurance Plan:- आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःचा विमा असणे खूप गरजेचे आहे. विमा योजनांच्या माध्यमातून आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक दृष्टिकोनातून भविष्य सुरक्षित करू शकतो.
अनेक व्यक्ती हे आता विमा योजनांना प्राधान्य देताना दिसून येतात. आयुष्यामध्ये केव्हा काय घडेल हे कुणालाच माहीत नसल्यामुळे दुर्दैवाने काही परिस्थिती उद्भवली तर कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता राहावी या दृष्टिकोनातून विमा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
त्यामुळे बऱ्याच व्यक्ती आता जीवन आणि मुदत विमा सोबतच आरोग्य विमा योजनांना देखील प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु विमा घेताना बऱ्याचदा टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स अशा प्रकारच्या विमा योजना असतात.
आपली गरज ओळखून आपण यापैकी चांगल्या योजनेची निवड करू शकता. परंतु लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा आणि मुदत विमा यापैकी जास्त फायद्याची योजना कोणती आहे किंवा यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या फरक कसा आहे?
यामध्ये बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण या दोन्ही योजना विषयी माहिती घेणार आहोत.
लाइफ इन्शुरन्स अर्थात जीवन विमा
लाइफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच यामध्ये तुम्हाला जीवन संरक्षण देण्यात येते. म्हणजेच कुटुंबातील ज्या व्यक्तीने विमा उतरवलेला आहे व त्या व्यक्तीचा जर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला तर विमा कंपनीच्या माध्यमातून त्याला विम्याच्या माध्यमातून जी रक्कम नमूद केलेली असते
ती व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला देण्यात येते. या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू आणि परिपक्वता अशा दोन्ही प्रकारचे लाभ दिले जातात. साधारणपणे लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम टर्म इन्शुरन्स म्हणजेच मुदत विम्यापेक्षा जास्त असतो.
परंतु यामध्ये तुम्हाला विम्याचे लॉंग कव्हरेज मिळते तसेच तुम्हाला मॅच्युरिटी रिटर्न देखील लाइफ इन्शुरन्स च्या माध्यमातून मिळतात.
टर्म इन्शुरन्स अर्थात मुदत विमा
टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये तुम्हाला मर्यादित कालावधी करीता एका निश्चित पेमेंट वर कव्हरेज मिळते. या कालावधी दरम्यान म्हणजेच या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून संपूर्ण आर्थिक मदत दिली जाते.
यामध्ये तुम्ही जितक्या लवकर टर्म इन्शुरन्स घ्याल तितके फायदे तुम्हाला जास्त मिळतात. तुम्ही जर कमी वयामध्ये टर्म इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला कमीत कमी प्रीमियम मध्ये विमा घेता येऊ शकतो. टर्म इन्शुरन्स प्लॅन हे लाइफ इन्शुरन्स पेक्षा स्वस्त आहेत.
जर तुम्ही टर्म इन्शुरन्समध्ये प्रीमियम भरणे बंद केले तर तुमची पॉलिसी बंद होते व याचा तुम्हाला कोणताही प्रकारचा फायदा मिळत नाही. परंतु जीवन विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स योजनेमध्ये तुम्ही प्रीमियम भरणे बंद केले तरी तुमची पॉलिसी थांबत नाही.
अशा प्रसंगी तुम्हाला प्रीमियम अंतर्गत जमा केलेले पैसे मिळतात. परंतु पॉलिसीची पूर्ण रक्कम मिळत नाही. तसेच लाइफ इन्शुरन्समध्ये तुम्ही दीर्घ मुदतीची योजना निवडली तर तुम्हाला जीवन संरक्षणासह परिपक्वता परतावा देखील मिळतो.
परंतु तुम्हाला जर स्वस्तात विमा हवा असेल तर तुम्ही लाइफ इन्शुरन्स ऐवजी टर्म इन्शुरन्स घेणे अधिक फायद्याचे आहे. कारण लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियम हा टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियम पेक्षा महाग असतो.