आर्थिक

वयाच्या 66 व्या वर्षी सुरु केलेला सोनालीका ग्रुप आज आहे 25 हजार कोटींचा! वाचा लक्ष्मीदास मित्तल यांचा एलआयसी एजंट ते उद्योजक असा प्रवास

Published by
Ajay Patil

कुठलीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन येत नाही. जर कुठल्याही वयामध्ये व्यक्तीत जबर इच्छाशक्ती, कुठलीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची उर्मी आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची इच्छा असेल तर व्यक्ती कुठल्याही वयामध्ये यशस्वी होऊ शकतो.

अगदी हा मुद्दा जर आपण उद्योजक लक्ष्मीदास मित्तल यांच्या बाबतीत समजून घेतला तर महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे 2024 च्या ‘फोर्ब्स’ अब्जाधीशांच्या  यादीमध्ये त्यांचा नुकता समावेश करण्यात आला असून विशेष म्हणजे ते देशातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश ठरले आहेत. विशेष म्हणजे लक्ष्मी दास मित्तल हे वयाच्या साठाव्या वर्षी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मधून रिटायर्ड झाले व नंतर उद्योजक बनले. विशेष म्हणजे आज मित्तल 25 हजार कोटी रुपयांचे मालक आहेत.

 कशी केली उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात?

लक्ष्मीदास मित्तल यांचा जन्म पंजाब राज्यातील होशियारपुर येथे 1931 मध्ये झाला. नंतर त्यांनी भारतीय जीवन बीमा निगम अर्थात एलआयसीचे विमा एजंट म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी संपादन केलेली आहे व त्याचे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण देखील झालेले आहेत.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर डोक्यामध्ये उद्योजक व्हावे हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्यांनी त्यासाठीचे पहिले पाऊल टाकले व मारुती उद्योगाची डीलरशिप घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र त्यांनी 1990 पर्यंत एलआयसी एजंट म्हणून काम केले व वयाच्या 60व्या वर्षी ते एलआयसी एजंट म्हणून निवृत्त झाले

व त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने व्यवसायाला सुरुवात केली. याकरिता त्यांनी सबंध आयुष्यामध्ये जी काही पैशांची बचत केलेली होती त्यामधून शेतीसाठी उपयुक्त पडतील असे यंत्रे निर्मिती करणारी कंपनी सुरु केली व 1996 मध्ये या कंपनीने मोठी झेप घेत इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड हे कंपनी स्थापन केली

व वयाच्या 66 व्या वर्षी म्हणजे १९९६ मध्ये सोनालीका ट्रॅक्टरची सुरुवात केली. भारतीय शेतकऱ्यांमध्ये हे ट्रॅक्टर चांगलेच पसंतीला उतरले व आज लक्ष्मीदास मित्तल यांचा सोनालिका ग्रुप पंचवीस हजार कोटी पर्यंत पोहोचला आहे.

 सोनालीका ट्रॅक्टरचे पाच देशांमध्ये आहेत प्लांट

विशेष म्हणजे आज सोनालिका ग्रुपच्या ट्रॅक्टरचे पाच देशांमध्ये प्लांट असून जगातील 120 देशांमध्ये सोनालीका ट्रॅक्टर विकले जातात. सध्या लक्ष्मीदास मित्तल हे कंपनीचे कुठलेही काम वयामुळे पाहत नसून त्यांचा मुलगा अमृत सागर हे कंपनीचे सध्या व्हाईस चेअरमन आहेत तर लहान मुलगा दीपक हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

Ajay Patil