आर्थिक

Recurring Deposit : बँक की पोस्ट ऑफिस, कुठे आरडी करणे फायदेशीर?, जाणून घ्या उत्तम पर्याय…

Published by
Sonali Shelar

Recurring Deposit : सध्या बचतीला जास्त महत्व दिले जात आहे, कोरोना काळापासून सगळ्यांनाच बचतीचे महत्व समजले आहे. म्हणूनच आज प्रत्येकजण बचत करताना दिसत आहे, काही जण एफडी करतात तर काही जण RD करणे पसंत करतात. जर तुम्ही महिना पगारदार असाल तर तुमच्यासाठी RD द्वारे गुंतवणूक करणे फायद्यची ठरेल. कारण तुम्हाला इथे एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही तर, तुम्ही जर महिन्याला ठराविक रक्कम जमा करू शकता.

RD खाते तुम्ही बँक किंवा पोस्टाद्वारे उघडू शकता. या दोन्हीचे व्याजदर वेगेवगेळे आहेत. अशातच दोघांपैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे? आणि कुठे पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल हे आज आम्ही सांगणार आहोत. चला तर मग…

आवर्ती ठेव म्हणजे काय?

ही एक पद्धतशीर बचत योजना आहे. ज्यामध्ये दर महिन्याला काही रक्कम जमा केली जाते. ठराविक कालावधीसाठी जमा केल्यानंतर तुम्हाला व्याजासह परतावा मिळतो. या योजनेला मध्यमवर्गीय कुटुंबांची अधिक पसंती आहे. यामध्ये कोणताही आयकर लाभ नाही. तसेच, मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाईल. त्यामुळे यावर टीडीएस भरावा लागेल.

पोस्ट ऑफिस आरडी आणि बँक आरडीमध्ये काय फरक आहे?

दोघांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे कालावधी. पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांचा आरडी आहे. तर बँका सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत आरडीचा पर्याय देतात. अनेक बँकांमध्ये लॉक इन पीरियड नाही. त्यामुळे वेळेपूर्वी पैसे काढणे सोपे होते. परंतु मुदतीपूर्वी पैसे काढल्यास दंड भरावा लागतो. पोस्ट ऑफिसमध्ये तीन वर्षांच्या कालावधीनंतरच आरडी खाते बंद केले जाऊ शकते.

कोण गुंतवणूक करू शकते?

कोणताही भारतीय नागरिक आरडीमध्ये गुंतवणूक करू शकतो. जर गुंतवणूकदाराचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर तो त्याच्या पालकासह गुंतवणूक सुरू करू शकतो. हे खाते संयुक्तपणेही उघडता येते.

व्याजदरातील फरक

बहुतेक बँका पोस्ट ऑफिसपेक्षा आरडीवर कमी व्याज देतात. मात्र काही खाजगी बँका यात पुढे आहेत. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा पोस्ट ऑफिसपेक्षा जास्त व्याज देत आहेत. या बँका आरडीवर ६.७५ टक्के ते ७ टक्के व्याज देतात.

किती  गुंतवणूक करू शकता?

यामध्ये कोणतीही व्यक्ती केवळ 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते.

कोणता पर्याय चांगला ?

बँका आणि पोस्ट ऑफिस दोन्ही आपापल्या ठिकाणी उत्तम आहेत. बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये अधिक सुरक्षिततेची हमी असते. खाते बंद करण्याच्या नियमांमध्ये बँका अधिक चांगल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दोन्हींमध्ये कुठेही गुंतवणूक करू शकता.

Sonali Shelar