SBI Interest Rate Hike : SBI बँकेचे खातेधार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. SBI ने शुक्रवारी कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
बँकेने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जावरील EMI मध्ये वाढ केली आहे. SBI ने कर्जावरील व्याजदर 10.10 टक्क्यांवरून 10.25 टक्के केला आहे. अशातच जर तुम्ही सध्या या बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ते पूर्वीपेक्षा अधिक महाग पडणार आहे.
MCLR दर
MCLR वर आधारित कर्ज आता 8 ते 8.85 टक्के दरम्यान उपलब्ध असेल. एका रात्रीत MCLR 8 टक्के आणि 1 आणि 3 महिन्यांसाठी MCLR 8.20 टक्के झाला आहे. 6 महिन्यांसाठी MCLR 10 बेसिस पॉइंट्सने 8.55 टक्क्यांनी वाढवला आहे. 1 वर्षाच्या ग्राहक कर्जासाठी MCLR 8.65 टक्के झाला आहे. 2 आणि 3 वर्षांसाठी MCLR 10 बेसिस पॉइंट्सने वाढवून अनुक्रमे 8.75 आणि 8.85 टक्के करण्यात आला आहे.
बीपीएलआरवरही वाढ
बँकेने बेंचमार्क कर्जदरातही वाढ केली आहे. हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत. BPLR 25 bps ने 14.85% वरून 15% पर्यंत वाढवलेला आहे. MCLR वाढल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम होईल. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था MCLR खाली कर्ज देऊ शकत नाही. मात्र, याला काही अपवाद असू शकतात.
MCLR म्हणजे काय?
MCLR हा किमान व्याज दर आहे ज्यावर बँकेद्वारे ग्राहकांना कर्ज दिले जाते. SBI ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे जिची धोरणे देशातील इतर बँका देखील पाळतात. अशा स्थितीत इतर बँकाही व्याजदर वाढवू शकतात, असा अंदाज आहे. त्याचबरोबर या वाढलेल्या व्याजदराचा फटका थेट खातेदारांच्या खिशाला बसणार आहे, कारण आता गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जाचा मासिक हप्ता वाढणार आहे.