अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- भारतातील शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर असतानाच ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे.
भांडवली बाजारावरही त्यांचा परिणाम दिसून आला. कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे आठवड्याच्या पहिल्याच (सोमवारी) दोन्ही निर्देशांक चांगलेच कोसळले आहे. दरम्यान चालू सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी बुडाले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1406 अंकांनी म्हणजे 3 टक्क्यांनी कोसळून 45,553 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 432 अंकांनी कोसळून 13,328 अंकांवर बंद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या जोरदार घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं तब्बल 7 लाख कोटींचं नुकसान झालं आहे.
युरोपियन शेअर बाजारात जोरदार घसरण झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारावरही त्याचा जबरदस्त परिणाम दिसून आला. निर्देशांकाचा दिवसभरातील कल, आणि कोरोनाविषयक घडामोडी पाहून भारतीय शेअर बाजारात शेअर्सच्या विक्रीचा मोठा दबाव निर्माण झाला.
तर याच दबावामुळे सेंसक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. नव्या कोरोनामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही झाला.
रुपया 21 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 73.78 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. जागतिक परिस्थिती खराब झाल्यामुळे चलन व्यापारी डॉलरची खरेदी करीत असल्याचे दिसून आले.
कोरोनामुळे मोठ्या इंडस्ट्रीजना फटका तर बसलाच, मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सचीही किंमत कमी झाली. भारतीय शेअर बाजारावरील स्मॉलकॅप इंडेक्स 4.17 टक्क्यांनी तर मिडकॅप इंडेक्स 4.14 टक्क्यांनी कमी झाला.