आर्थिक

चांद्रयान 3 चे यश हे या कंपनीच्या पथ्यावर! अगदी थोड्या दिवसात कमावले 40,195 कोटी रुपये,वाचा महत्त्वाची माहिती

Published by
Ajay Patil

गेल्या 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेने अलौकिक यश मिळवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. परंतु जर आपण चंद्रयान तीन च्या यशाचा विचार केला तर यामध्ये अनेक व्यक्ती आणि कंपन्यांचा सहभाग होता. अनेक जणांचे कष्ट आणि प्रचंड मेहनत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उपयोगी पडले. त्यामुळे नक्कीच या मोहिमेच्या यशाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या फायदा बऱ्याच कंपन्यांना देखील झाला.

याच पद्धतीने चांद्रयान तीन च्या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्यामुळे चांगली वाढ झाली. काही कंपन्यांचे मार्केट कॅप देखील वधारले. या पद्धतीचा फायदा लार्सन अँड टुब्रो या कंपनीला देखील झाला व 18 ऑगस्ट नंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांची वाढ होत कंपनीचे मार्केट कॅप म्हणजेच बाजार मूल्य हे 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढले. कंपनीचे मार्केट कॅप हे चार लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. त्यामुळे या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा झाला.

 चांद्रयान तीनच्या यशानंतर लार्सन अँड टुब्रोच्या शेअर मध्ये कशा पद्धतीने झाली वाढ?

जर आपण गेल्या 20 ते 25 दिवसाचा विचार केला तर लार्सन अँड टुब्रो अर्थात एल अँड टी या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर आपण 18 ऑगस्टचा विचार केला तर या दिवशी लार्सन अँड टुब्रो कंपनीचा शेअर्स 2639.90 रुपयांवर होता. परंतु आता या शेअरची किंमत 2926 रुपये इतकी झालेली आहे.

गेल्या 25 दिवसांमध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 286 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली व यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे जगातील जी काही सर्वात मोठी तेल कंपनी आहे त्या सौदी अरामकोने देखील चार बिलियन डॉलर पेक्षा मोठी ऑर्डर दिल्यामुळे देखील या कंपनीच्या शेअर मूल्यात वाढ झालेली आहे. यामुळे कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये वाढ झाली.

18 ऑगस्टला शेअर मार्केट बंद होण्याआधी कंपनीचे मार्केट कॅप 3 लाख 70 हजार 892.49 कोटी रुपये होते. सध्या लार्सन अँड टुब्रो कंपनीचा शेअर 2926 रुपयाला असून कंपनीची मार्केट कॅप चार लाख 11 हजार 88 पर्यंत पोहोचली आहे व यामुळे गुंतवणूकदारांना देखील चांगला परतावा मिळत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil