Investment In Gold Or Shares:- गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय सध्या उपलब्ध असून गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांचा गुंतवणूक करण्यासाठी वापर करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बँकांच्या मुदत ठेव योजना तसेच पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल जास्त दिसून येतो.
परंतु गेल्या काही वर्षांचा विचार केला तर म्युच्युअल फंड एसआयपी आणि शेअर मार्केट मधील गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच सोन्यातील गुंतवणूक ही तर आपल्याकडे पारंपारिक गुंतवणुकीची पद्धत मानली जाते व गेल्या कित्येक वर्षापासून भारतामध्ये सोन्यात गुंतवणूक केली जाते.
परंतु सोन्यात गुंतवणुकीचे देखील आता वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले असून तुम्ही भौतिक सोन्याऐवजी डिजिटल पद्धतीने देखील सोन्यात गुंतवणूक करू शकतात. या अनुषंगाने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करावी की सोन्यामध्ये? तसेच कुठून जास्त परतावा मिळेल आणि कुठे गुंतवणूक सुरक्षित राहील? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
शेअर्समधील गुंतवणूक फायद्याचे ठरेल की सोन्यातील?
शेअर बाजार असो की सोने या दोन्ही पर्याया मधून गुंतवणूक केल्याने गेल्या काही काळापासून चांगला परतावा मिळताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु जर शेअर मार्केटचा विचार केला तर यामध्ये कधी घसरण दिसून येते तर कधी तेजी पाहायला मिळते.
तसेच सध्या सोन्याच्या किमती जर बघितल्या तर त्या देखील उच्चांकी पातळीवर असून येणाऱ्या काही दिवसात सोने 80 हजार रुपये प्रति तोळा जाईल की काय अशी स्थिती आहे. या अनुषंगाने सोन्यातील गुंतवणूक फायद्याची की शेअर्समधील गुंतवणूक? त्याबद्दलची माहिती बघू.
सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरते
यामध्ये आर्थिक तज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला परताव्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर स्टॉक हा एक चांगला पर्याय असेल. मात्र गेल्या काही वर्षापासून सोन्याने शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा दिल्याची स्थिती आहे. वास्तविक सोने हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो.
तुम्ही जर भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही गरजेच्या वेळी ते विकू शकता आणि तुमची आर्थिक गरज देखील भागवू शकतात. तसेच उच्च महागाईच्या कालावधीत देखील सोने उपयुक्त ठरते. त्यामुळे भारतामध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.
सोन्यात गुंतवणुकीसाठी ही ट्रिक वापरावी
जर तुम्ही स्टॉक आणि सोने या दोन्हींमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या सुमारे दहा टक्के रक्कम सोन्यात गुंतवावी. तुम्ही तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये पाच ते दहा टक्के सोने ठेवावे असे आर्थिक तज्ञांचे म्हणणे आहे.
त्याचवेळी जर तुम्हाला कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायचे असेल तर तुमच्या गुंतवणुकीपैकी 20% गुंतवणूक सोन्यामध्ये करावी.
गोल्ड ईटीएफ हा देखील सोन्यात गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे
सध्या तुम्ही भौतिक सोन्याबरोबर डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकतात. भौतिक सोने सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असते व भौतिक सोने चोरी जाण्याचा देखील धोका असतो.
या अर्थाने जर तुम्हाला भौतिक सोने खरेदी करायची नसेल तर मात्र तुम्ही डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असून त्यापैकी गोल्ड ईटीएफ हा चांगला पर्याय आहे.
स्टॉकमध्ये कधी गुंतवणूक करावी?
समजा तुम्हाला स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदाराने शेअर बाजाराच्या हालचालींवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते. बाजार घसरला की गुंतवणूकदाराने गुंतवणूक करावी असा सल्ला शेअर बाजारातील तज्ञ देतात.
त्याचवेळी जर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याने शेअर घसरला किंवा लोअर सर्किटमध्ये असल्याचे दिसून आले तर अशा परिस्थितीत घेतलेला शेअर्स घाईघाईने विकू नये. बाजारात येण्याची वाट पाहणे अशाप्रसंगी गरजेचे असते. आर्थिक तज्ञांच्या मते शेअर बाजारातून तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर संयम खूप आवश्यक असल्याचे म्हटले जाते.