Silver Price : पाच हजारांनी महाग झाली चांदी ! पहा जानेवारीपासून नक्की काय घडलं ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Silver Price : अधिक मासानिमित्त जावयाला वाण देण्याची प्रथा / पद्धत. वाण म्हणून चांदीचे ताट, वाटी, लोटी, भांडे, निरांजन दिले जाते. यंदा अधिक श्रावणमासानिमित्त वाण देण्याच्या निमित्ताने चांदीच्या वस्तूंची विक्रमी विक्री झाली.

यावर्षी अधिक मास, दोन श्रावण आणि त्यातही आठ श्रावणी सोमवार आल्यामुळे चांदीबरोबरच धातू बाजारामध्ये पितळ आणि तांबे यांच्या वस्तूंना जबरदस्त मागणी आली होती.

१८ जुलैपासून अधिकमास सुरू झाला. या महिन्यांमध्ये जावई-मुलीला भेट म्हणून चांदी भेटीच्या स्वरूपात देण्याची प्रथा आहे. दीपदानाचे महत्त्व या महिन्यात असल्याने तांबे अथवा चांदीचा दिवा, ताट-वाटी, तांब्या, कलश, ग्लास, समई, ताम्हण याचे दान जावयाला दिले जाते.

यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रतिकिलो ७०,६०० असलेल्या चांदीने ७५,००० रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव खाल्ला. पण तरीसुद्धा त्याची तमा न बाळगता झालेल्या खरेदीमुळे चांदीची चकाकी वाढली आहे.

यावर्षी अधिक मासात चांदीची विक्रमी विक्री झाली असून त्यामध्ये जवळपास ७० ते ८० टक्के वाढ झाली असल्याचे सराफ बाजारातील जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. अधिक मासामध्ये चांदीची विक्री साधारणपणे तीन तीन पट वाढते यावर्षी चांदीची विक्रमी विक्री झालेली आहे.

गृहिणींच्या जोडवी आणि पैंजण यांची मागणी खूप आहे. तीन वर्षांपूर्वीच्या अधिक मासाच्या तुलनेमध्ये विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. परिणामी यावर्षी दर वाढूनही चांदी बाजारात तेजी आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.

अधिकमास तीन वर्षांतून एकदा येत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून तांबे पितळाच्या भांड्यांची दिव्यांची मागणी वाढली आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मागणीने जोर धरला आहे. या धातूंच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे बॉम्बे मेटल असोसिएशनचे संचालक आणि माजी अध्यक्ष हेमंत पारेख यांनी सांगितले.

जोडवे, पैंजण विक्रीत ५० टक्के वाढ गृहिणी या काळात जोडव्यांमध्ये चांदीची भर टाकतात. विशेष करून ग्रामीण भागात हे चित्र बघायला मिळते. त्यामुळे जोडवी, पैंजणच्या विक्रीत ५० टक्के वाढ झाली. या आधीच अधिकमास कोरोना काळात आला होता. त्या तुलनेत विक्रीमध्ये या वर्षी ७० ते ८० टक्के वाढ झाली असल्याचे पी. एन. गाडगीळ अँड सन्स लि.चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सांगितले.