Solar Subsidy Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली व या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी घरांवर रूफ टॉप सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेतल्यामुळे ग्रीड जोडलेल्या विजेचा वापर कमी होईल आणि ग्राहकांच्या विजबिलात मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच मीटरच्या तरतुदीनुसार या सोलर प्लांटमधून तयार होणारी अतिरिक्त वीज ग्रीडला पाठवली जाऊ शकते. अतिरिक्त निर्यात केलेल्या विजेकरिता ग्राहकांना आर्थिक फायदा देखील या माध्यमातून मिळू शकतो
आपल्याला माहित आहे की पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कमाल 78 हजार रुपये पर्यंत अनुदान देखील मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल नोंदणी?
टपाल विभागाच्या माध्यमातून पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेकरिता नोंदणी मोहीम सुरू केली असून यासाठीची नोंदणी करण्याकरिता पोस्टमन नागरिकांना मदत करणार आहेत. तसेच या योजनेच्या अधिक माहिती करिता तुम्ही https://pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळा देखील भेट देऊ शकतात किंवा तुमच्या परिसरातील पोस्टमनशी संपर्क साधू शकतात.
या योजनेसाठी आवश्यक पात्रता
1- याकरिता एक मार्च 2024 रोजी जारी केलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रकाशनानुसार या योजनेसाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
2- तसेच संबंधित व्यक्तीच्या घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी योग्य छप्पर असणे गरजेचे आहे.
3- महत्त्वाचे म्हणजे संबंधित कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
4- तसेच या अगोदर सोलर पॅनलसाठी इतर कोणत्याही अनुदान योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेतलेला नाही त्यांनाच ही जोडणी दिली जाणार आहे.
या योजनेसाठी कसा करावा अर्ज?
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने अगोदर या योजनेची वेबसाईट pmsurygarh.gov.in वर स्वतःचे अकाउंट तयार करावे व यावरून रुफ टॉप सोलर सिस्टम इन्स्टॉल करण्याकरिता ग्राहकांना निर्माता आणि पुरवठादार निवडण्याचा या ठिकाणी पर्याय आहे.
1- सगळ्यात अगोदर या पोर्टल वर नोंदणी करावी व नोंदणी केल्यानंतर तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करावी. ही निवड केल्यानंतर तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकावा.
2- ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करावे आणि फॉर्म नुसार रूफ टॉप सोलर साठी अर्ज करावा.
3- एकदा तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर कोणताही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर प्लांट इन्स्टॉल करावा.
4- सोलर प्लांट चे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांटचा तपशील सबमिट करावा आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा.
5- नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
6- तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्याचे तपशील व कॅन्सल केलेला चेक सबमिट करावा. त्यानंतर तुमची अनुदानाची रक्कम बँक खात्यात तीस दिवसांच्या आत मिळते.
किती मिळेल अनुदान?
एक किलो वॅट रूफ टॉप सोलर सिस्टम करिता किमान अनुदान 30000, दोन किलोवॅट प्रणाली बसवणाऱ्यांसाठी 60000 तर तीन किलोवॅट सोलर सिस्टम बसवणाऱ्या कुटुंबांना 78 हजार रुपये अनुदान मिळेल.