आज आपण अनेक यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी लोक या समाजामध्ये पाहतो व त्यांच्याकडे पाहून आपल्याला नक्कीच हेवा वाटतो. परंतु जर या यशस्वी लोकांच्या भूतकाळातील आयुष्यामध्ये जर आपण डोकावून पाहिले तर त्यांचा कालावधी इतका खडतर अशा प्रसंगांनी भरलेला असतो की कित्येकदा त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी देखील झगडावे लागलेले असते
व अशा सगळ्या विपरीत परिस्थिती मधून रस्ता काढत काहीतरी मोठे करायचे या एका ध्येयाने ते पुढे जात राहतात व मोठ्या प्रमाणावर कष्ट करून यशस्वी होतात. यामध्ये त्यांचे व्यवस्थित प्लॅनिंग देखील असते व जरी हातामध्ये पैसा नसला तरी पैसा निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरतात.
याच मुद्द्याला धरून जर आपण रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक असलेले रमेश बाबू यांची यशोगाथा पाहिली तर ती खरंच इतर उद्योजकांना किंवा तरुणांना प्रेरणा देणारी आहे. जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांशी दोन हात करत त्यांनी आयुष्यामध्ये हे अनन्यसाधारण असे यश मिळवलेले आहे.
सलून व्यवसायापासून केली सुरुवात
रमेश बाबू यांच्या जर कौटुंबिक व्यवसाय पाहिला तर तो सलून व्यवसाय होता व त्यांचे वडील न्हावी होते. परंतु रमेश बाबू जेव्हा सात वर्षाचे होते तेव्हाच त्यांचे वडिलांचे दुर्दैवी निधन झाले व कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलण्यासाठी रमेश बाबूंना खूप मोठा संघर्ष कमी वयात करावा लागला. या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणात विपरीत आर्थिक परिस्थितीचा देखील सामना त्यांना करावा लागला व दोन वेळा कुटुंबाला जेवण मिळवणे देखील अशक्य व्हायला लागली.
परंतु या सगळ्या संकटांना न जुमानता त्यांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय पुढे सुरू ठेवायचे ठरवले व व्यवसायामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. वडिलांचे निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता त्यांच्या आईने मोलकरणीचे काम देखील केले. या कालावधीमध्ये रमेश बागुल यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली व कशीबशी १९९० मध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
वडिलांचा सलूनचा व्यवसाय त्यांनी चालवायला घेऊन कष्टाच्या जोरावर त्या साध्या प्रकारच्या सलूनचे स्टायलिश हेअर सलूनमध्ये रूपांतर केले. सलून व्यवसायामध्ये चांगला पैसा मिळायला लागल्यानंतर त्यांनी 1994 पासून व्यवसायामध्ये अनेक पर्याय शोधायला सुरुवात केली व सर्व व्यवसायातून जो काही पैसा वाचवला होता त्यातून त्यांनी एक मारुती ओमनी खरेदी करून वाहन भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये पाऊल ठेवले व या ठिकाणाहूनच आयुष्याला खरी कलाटणी मिळाली.
रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची केली स्थापना
मारुती ओमनी खरेदी केल्यानंतर कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी पुढे मोठ्या कष्टाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीमध्ये त्यांनी अनेक प्रकारचे वाहने समाविष्ट केली व त्यांचा हा ताफा संपूर्ण भारतभर कार भाड्याने देण्यासाठी वापरला जातो.
एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या या ताफ्यामध्ये मर्सिडीज ई क्लास सेदान कारदेखील विकत घेतली व भाड्याने आलीशान कार देणारी शहरातील पहिली व्यक्ती ठरण्याचा मान देखील त्यांना मिळाला.
हळूहळू या व्यवसायामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे जम बसवला व कालांतराने बीएमडब्ल्यू, रोल्स रॉयस घोस्ट, जग्वार तसेच मर्सिडीज मेबॅक यासारख्या चारशे पेक्षा अधिक लक्झरी कार यासारख्या उच्च श्रेणीतील वाहनांचा समावेश त्यांनी कंपनीच्या वाहनाच्या ताफ्यात केलेला आहे.
टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाव्यतिरिक्त ते आज भारतातील सर्वात श्रीमंत केशकर्तनकारां पैकी देखील एक आहेत व त्या व्यवसायामधून देखील ते करोडो रुपये कमवतात.
अमिताभ आणि आमिर खान सारखे सेलिब्रिटींनी देखील घेतला आहे त्यांच्या कार सेवेचा लाभ
वर्ष 2017 मध्ये रमेश बाबू यांनी 2.7 कोटी रुपये देऊन मायबॅक S600 खरेदी केली व तेव्हापासून ते खूप चर्चेत आले होते. रमेश बाबू यांच्या म्हणण्यानुसार बघितले तर अमिताभ बच्चन तसेच ऐश्वर्या राय-बच्चन व आमिर खान सारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी आणि सचिन तेंडुलकर सारख्या क्रिकेटपटूंनी देखील त्यांच्या कारसेवेचा वापर केलेला आहे.