Success Story :- रुळलेला आणि चांगला सुस्थितीतला मार्ग सोडून जोखीम पत्करून एखादा व्यवसायाची सुरुवात करणे म्हणजे आयुष्याशी जुगार खेळणे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु समाजातील असे अनेक तरुण आणि तरुणी दिसून येतात की त्यांना अशा पद्धतीचा जुगार खेळण्यात खूप हौस असते व ते यशस्वी देखील होतात. परंतु अशा प्रकारचा मार्ग स्वीकारताना अनंत अडचणींचा सामना करत मोठ्या धीराने आणि संयमाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे खूप गरजेचे असते.
कधी यामध्ये वारंवार देखील अपयश येत राहते. परंतु या अपयशाला न जुमानता संकटांवर विविध प्रकारे मार्ग काढून ते यशस्वी होतात. यामागे त्यांची कष्ट करण्याची तयारी तसेच आपले जे काही ध्येय आहे ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट आणि अभ्यास यांच्या जोरावर हे यश मिळते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण रोहित मांगलिक यांचा विचार केला तर तुम्हाला वरील मुद्दा पटेल. त्यामुळे या लेखात आपण रोहित मांगलिक यांचा यशस्वी प्रवास पाहणार आहोत.
रोहित मांगलिक यांची यशोगाथा
रोहित मांगलिक यांनी 2012 मध्ये एनआयटीच्या माध्यमातून बी टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे व यानंतर त्यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध अशा आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले. त्यानंतर 2017 मध्ये अचानकच त्यांनी नोकरी सोडली आणि फारुखाबादला ते परत आले व त्यांनी 2017 मध्ये नोकरी सोडली तेव्हा त्यांना वार्षिक बेचाळीस लाखांचे पॅकेज होते. परंतु नोकरीच्या ठिकाणी बंदिस्त वातावरणामध्ये काम करणे त्यांना आवडत नव्हते व त्यांच्या डोक्यात काहीतरी नवीन करावे हे सातत्याने सुरू असल्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकला.
याकरिता त्यांनी अगोदर स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला व अनंत अडचणींचा सामना करून सुरुवात केली. अगोदर जेव्हा त्यांनी नोकरी सोडली तेव्हा सात कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी करिअर काउंन्सलिंकची सुरू केले. परंतु या स्टार्टअप मध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर अपयश आले. या अपयशावर मात करत त्यांनी लखनऊ या ठिकाणी पत्रकार पुरम या परिसरामध्ये एक ऑफिस उघडले व कामाला सुरुवात केली व या ठिकाणी देखील त्यांना अपयश आले.
सलग यामध्ये दोन वेळा अपयश आल्यानंतर कौन्सेलिंगचा स्टार्टअप चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी ते बंद केले. त्यानंतर त्यांनी मुलांमध्ये जाणे सुरू केले व मुलांना कुठल्या समस्या आहेत व गरज आहे हे समजून घ्यायला सुरुवात केली व 2020 मध्ये तरुणांचा त्यांनी Edugorilla एप्लीकेशन तयार केले व या माध्यमातून त्यांनी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या संबंधातली अचूक माहिती मिळण्यासाठी प्रयत्न केले व ती विद्यार्थ्यांना मिळायला देखील लागली.
2020 मध्ये सुरू केलेला हा स्टार्टअप आता 2023 मध्ये तीन वर्षांमध्ये जगातील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या टॉप 10 कंपन्यांपैकी एक स्टार्टअप आहे. Edugorilla मध्ये तीनशे पेक्षा जास्त कर्मचारी आता काम करत असून या कंपनीची वार्षिक उलाढाल 10 कोटी रुपये एवढी आहे.हे एप्लीकेशन लोकांपर्यंत पोहोचावं याकरिता ते घरोघरी फिरले तसेच अनेक कोचिंग संस्थांना देखील त्यांनी भेट देऊन या अप्लिकेशनचे महत्त्व आणि गुणवत्ता बद्दल माहिती दिली.
त्यांच्या संपूर्ण टीमने प्रचंड प्रमाणे मेहनत घेतली व त्यांनी 3000 कोचिंग संस्थांशी करार केले व सध्या 70 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी त्यांच्या कंपनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांशी जोडले गेलेले आहेत. अशाप्रकारे त्यांची कंपनी आज जगातील दहा टॉप शैक्षणिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये असून वार्षिक दहा कोटींचा टर्न ओव्हर आहे. अशाप्रकारे दोन वेळेस अपयश येऊन देखील खचून न जाता त्यांनी हे यश संपादन केले.