आर्थिक

Success Story: हा तरुण स्वतःच्या शेतात पिकवतो हळद व पुण्यात करतो तयार हळदीची विक्री! मिळते 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न

Published by
Ajay Patil

Success Story:- शेतीमालाचे कायम घसरलेले बाजार भाव आणि त्यासोबत तोंडी घास आला असताना अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपदा यामुळे शेतकरी पुरते मेटाकुटीला आले असून शेतकरी चोहोबाजूंनी घेरले जाऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडल्याचे सध्या चित्र आहे.

दिवस-रात्र अतोनात मेहनत करून कष्टाने पिकवलेला शेतीमाल जेव्हा दोन पैसे हातात मिळतील या अपेक्षेने शेतकरी बाजारपेठेत विक्रीला नेतात तेव्हा बऱ्याचदा नफा तर सोडा परंतु उत्पादन खर्च देखील निघणे कठीण होऊन जाते. कधीकधी तर शेतीमाल न्यायचा खर्च म्हणजेच वाहतूक खर्च देखील खिशातून द्यायची पाळी शेतकऱ्यांवर येते अशी स्थिती आहे.

त्यामुळे विपरीत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी थोडी वेगळी वाट धरणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग किंवा शेतीमाल प्रक्रिया करून त्यांची विक्री करणे ही काळाची गरज आहे. शेतकरी जर प्रक्रिया उद्योगाकडे वळले तर नक्कीच शेतकरी तरू शकतील.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण मराठवाड्यातील एका तरुणाचा विचार केला तर या तरुणाने अनेक विपरीत परिस्थितींवर मात करत  स्वतःच्या शेतात कष्टाने पिकवलेली हळदीची विक्री बाजारपेठेत न करता हळद तयार करून हळदीची विक्री तो पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये करत असून बाजारपेठेतील दरांपेक्षा या ठिकाणी तरुणाला दुप्पट चा आर्थिक फायदा होत आहे.

 हळद विक्रीतून लाखात नफा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील वालूर या गावचे आनंद काळबांडे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे व ते त्यांच्या स्वतःच्या या दोन एकर शेतामध्ये हळदीचे लागवड करतात.

परंतु मोठ्या कष्टाने हळदीचे उत्पादन घेऊन जेव्हा ते बाजारपेठेत विक्रीला नेत होते तेव्हा व्यापाऱ्यांकडे मिळणारा दर हा खूपच सर्वसाधारण स्वरूपाचा होता. त्यामुळे हातात पैसा राहत न होता. त्यामुळे कष्ट करून पिकवलेल्या उत्पादनातून चांगला पैसा मिळावा ही इच्छा असताना व त्याकरिता काय करता येईल या विचारात असताना  आनंद यांना एक कल्पना सुचली व त्यांनी तयार हळद थेट ग्राहकांना विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

याकरिता त्यांनी त्यांच्या मोटार सायकलला दोन चाकी गाडा बांधला आणि त्यामध्ये एक गिरणी ठेवली. या गिरणीच्या माध्यमातून ते ग्राहकांसमोरच हळकुंडापासून  हळद तयार करून त्याची विक्री करायला त्यांनी सुरुवात केली. जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा परभणी शहरामध्ये हळद विकायला सुरुवात केली.

हळूहळू छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी व्यवसाय सुरू केला व त्यानंतर आता ते थेट पुण्यात तयार हळदीची विक्री करत असून खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवत आहेत. म्हणजे बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना हळद विकून जितका पैसा मिळत होता त्यापेक्षा दुप्पट पैसा थेट हळद विक्रीतून आनंद यांना मिळत आहे.

याबाबत बोलताना आनंद काळबांडे यांनी म्हटले की, माझ्या शेतामध्ये लागवड केलेल्या दोन एकर हळदीतून 40 क्विंटल उत्पादन मिळतं. परंतु जेव्हा ही 40 क्विंटल हळद व्यापाऱ्यांना विकत होतो तेव्हा एका एकर मध्ये दोन लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत होते. परंतु आता तयार हळद थेट ग्राहकांना विक्री करत असल्यामुळे एका एकर मधून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajay Patil