Success Story:- डोक्यामध्ये आलेली एखादी छोटीशी कल्पना देखील एक मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तसे पाहायला गेले तर कुठलीही गोष्ट करण्याआधी त्या गोष्टीविषयीचे विचार किंवा कल्पना आधी मनात येत असते व त्यानुसार काम केल्यावर त्या कल्पनेला वास्तव किंवा मूर्त स्वरूप येत असते.
अर्थात अशा कल्पनांसाठी आपल्याला प्रचंड प्रमाणात मेहनत आणि कष्ट देखील घ्यायला लागतात व प्रत्यक्षात ती कल्पना साकारण्यासाठी त्यानुसार नियोजन करून आपल्याला पुढे जावे लागते. अशाच काही भन्नाट कल्पना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुमचं नशीब पूर्णपणे पालटवून टाकतात. अशीच एका छोट्याशा कल्पनेतून दोन मित्रांनी सुरू केलेल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल काही कोटीत जाऊन पोहोचलेली आहे व याचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
अशाप्रकारे झाली चटणीफायची सुरुवात
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, अगदी शालेय जीवनापासून मित्र असलेले प्रसन्न नटराजन व श्रेयस राघव या दोन मित्रांनी एकत्रित येत चटणीफायची सुरुवात केली व चटणी विकून कोणी करोडपती होऊ शकते हे समाजाला सिद्ध करून दाखवले. जेव्हा हे दोघे शाळेपासून एकत्र होते तेव्हापासून त्यांची एकमेकांशी ओळख होती.
जर आपण घरातील लहान मुलांचा विचार केला तर त्यांना शाळेत पाठवणे व घरातील लोकांचे जेवण तयार करणे यामध्ये महिलांना अनेक प्रकारची ओढाताण सहन करावी लागते. या सगळ्या धावपळीमध्ये पटकन चटणी तयार करून महिलांच्या कामांमध्ये त्यांना थोडीफार मदत होईल यासाठी प्रयत्न करावा असा दोघांच्याही मनात विचार आला.
या विचारातूनच त्यांना चटणी बनवण्याची कल्पना सुचली व त्या बाबतीत त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग देखील केले. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तयार करताना त्यांनी त्यामध्ये अनेक प्रकारचे फ्लेवर्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तयार केल्या. यामध्ये सातत्याने बरेच बदल करत 2022 मध्ये त्यांनी चटणीफायची सुरुवात केली.
काय आहे चटणीफाय?
ही कंपनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चविष्ट चटण्या तयार करते व यामध्ये ताज्या व ऑथेंटिक असलेल्या चटण्या तयार करून या माध्यमातून त्यांनी या कंपनीची सुरुवात केली. चटणीफायच्या पॅकेज मध्ये तुम्ही पाणी मिसळले तर पाच सेकंदामध्ये चांगली चटणी तयार करू शकतात.
या चटणीला भारतातच नव्हे तर ब्रिटन तसेच जर्मनी व अमेरिका सारख्या देशात देखील खूप मोठी मागणी आहे. त्यांच्या या उत्पादनाची मागणी सातत्याने वाढत असून प्रसन्न आणि श्रेयस हे दोघे मित्र चटणी व्यवसायातून महिन्याला 50 लाख रुपये कमवतात व वर्षाचा टर्नओव्हर पाहिला तर तो सहा कोटीच्या घरात आहे.
विशेष म्हणजे अमेरिका तसेच ब्रिटन, सिंगापूर आणि जर्मनी या ठिकाणी त्यांचे हे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर विकले जाते. नुकतीच मागच्या वर्षी या कंपनीचे सुरुवात झालेली असली तरी देखील या कंपनीने अल्पावधीत बाजारात खूप मोठे स्थान निर्माण केले असून ग्राहकांच्या पसंतीस हे उत्पादन उतरले आहे. चटणी विकून कोणी कोटी रुपये कमवू शकते याचा विचार देखील कधी आपल्या मनात येऊ शकत नाही परंतु ही छोटीशी कल्पना या दोन्ही मित्रांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.