आर्थिक

सुकन्या समृद्धी योजनेतून तुमच्या मुलीला बनवा 70 लाख रुपयांची मालक! कोणत्या प्लॅनिंगने होईल शक्य?

Published by
Ratnakar Ashok Patil

Sukanya Samriddhi Yojana:- केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व त्यातीलच जर आपण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येणारी सरकारी योजना बघितली तर ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. मुलीच्या आर्थिक उज्वल भविष्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची असून 22 जानेवारी 2025 रोजी या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली.

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींना डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. मुलींच्या भविष्यकालीन आर्थिक गरजा भागवण्यासाठी या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण असून तुमच्या नावाने जर मोठा फंड जमा करायचा असेल तर ही योजना अतिशय फायद्याची आहे.

या योजनेतील गुंतवणुकीच्या कमाल मर्यादेनुसार सुमारे 70 लाख रुपयांचा निधी या योजनेच्या माध्यमातून जमा करता येणे शक्य आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वात जास्त व्याज देणारी एक छोटी बचत योजना आहे व संपूर्णपणे करमुक्त असणारी योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजनेतील सर्वात खास वैशिष्ट्ये कोणते?
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्हाला पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते व सरकार तुम्हाला पुढील सहा वर्षांसाठी म्हणजेच या योजनेच्या परिपक्वता कालावधी पूर्ण होईपर्यंत म्हणजे 21 वर्षापर्यंत एकूण क्लोजिंग बॅलन्सवर व्याज देते.

हे पूर्णपणे करमुक्त योजना आहे व यावर तीन वेगवेगळ्या स्तरांवर कर सवलत उपलब्ध आहे. या योजनेमध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण गुंतवणुकीच्या तीन पट रक्कम मिळण्याचे हमी आहे.

या योजनेतून 70 लाख रुपयांचा निधी कसा तयार करता येतो?
समजा तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जानेवारी 2025 म्हणजेच या महिन्यात खाते उघडले व सुकन्या समृद्धीमध्ये वार्षिक 8.2 टक्के व्याजदर मिळतो व यानुसार जर तुम्ही वर्षाला कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक पंधरा वर्षांसाठी केली तर तुमचे पंधरा वर्षात 22 लाख 50 हजार रुपये जमा होतात.

या योजनेचा परिपक्वता अर्थात मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षाचा आहे व या 21 वर्षांमध्ये एकूण व्याजाचे तुम्हाला 46 लाख 77 हजार 578 रुपये मिळतात व अशाप्रकारे तुमची एकूण गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज मिळून 21 वर्षानंतर म्हणजेच 21 वर्षे मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर एकूण 69 लाख 27 हजार 578 रुपये मिळतात. 2025 मध्ये जर तुम्ही खाते उघडले तर जानेवारी 2046 मध्ये ही योजना मॅच्युअर होईल.

ही योजना आहे संपूर्ण करमुक्त
सुकन्या समृद्धी योजना ही करमुक्त योजना आहे व यावर तीन वेगवेगळ्या स्तरांवर कर सवलत उपलब्ध आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1 लाख 50 हजार रुपये पर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सूट मिळते

व दुसरे म्हणजे यातून मिळणारा जो काही परतावा आहे त्यावर देखील कर लागत नाही आणि मॅच्युरिटीवर जी तुम्हाला रक्कम मिळते त्याच्यावर देखील कर लागत नाही. अशा प्रकारे ही योजना पूर्ण करमुक्त आहे.

कसा आहे या योजनेचा परिपक्वता कालावधी?
सुकन्या समृद्धी योजनेचा परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. तुम्ही जर नवजात मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले तर ते 21 वर्षांनी परिपक्व होते.

परंतु यामध्ये तुम्हाला फक्त पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल व खाते त्यानंतर सहा वर्षांनी परिपक्व होते. उरलेल्या सहा वर्षांमध्ये तुम्हाला योजनेअंतर्गत तुमच्या ठेवीवर निश्चित व्याज मिळत राहते. तुम्ही जर तीन वर्षाच्या मुलीसाठी खाते सुरू केले तर चोवीस वर्षात ही योजना परिपक्व होईल व मुलगी 18 वर्षाची झाल्यावर ती तिचे खाते स्वतः मॅनेज करू शकते.

सुकन्या समृद्धी योजनेत किती आहे ठेव मर्यादा?
सुकन्या समृद्धी योजनेत एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. त्याचवेळी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात. गुंतवणुकीचा पर्याय मासिक आधारावर देखील आहे व जास्तीत जास्त 12500 रुपये प्रत्येक महिन्याला यामध्ये गुंतवणूक करता येते.

Ratnakar Ashok Patil