सौर ऊर्जेला चालना व प्रोत्साहन देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या माध्यमातून पावले उचलण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून देशांमध्ये सौर ऊर्जेला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्यघर योजना सुरू करण्यात आलेली आहे
व या योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास एक कोटी लोकांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यात येणार आहे व त्याकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे. यामध्ये साधारणपणे 30000 पासून ते 76 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 300 युनिट मोफत विज देण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्याकरिता सोलर पॅनल बसवणे गरजेचे असणार आहे.
सोलर पॅनल बसवण्याचा खर्च जर पाहिला तर तो खूप जास्त असल्यामुळे अनेक व्यक्तींना तो परवडत नाही. परंतु यामध्ये काळजी करण्याची गरज नसून तुम्हाला देखील सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्याकरिता काही बँका कर्ज देखील देत आहेत.
कसे आहे बँकांच्या माध्यमातून देण्यात येणारे कर्जाचे स्वरूप?
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्याकरिता सरकार अनुदान देत आहे. परंतु या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर सौर पॅनल बसवणे गरजेचे आहे त्याकरिता तुम्हाला तुमच्या खिशातून अगोदर पैसे खर्च करणे महत्त्वाचे आहे.
नंतर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला अनुदानाची रक्कम मिळते. तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्ही पंतप्रधान सूर्य घर योजनेतून तीन किलो वॅट आणि दहा किलो वॅटचा सौर पॅनल बसवण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात.
समजा तुम्हाला तीन किलोवॅटचा सोलर प्लांट बसवायचा असेल तर तुम्हाला बँक दोन लाख रुपये पर्यंत खर्च देते. तीन किलोवॉट सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला दहा टक्के खर्च करावा लागतो व 90 टक्के कर्ज मिळते.
याशिवाय तुम्हाला दहा किलोवॉट सोलर प्लांट बसवायचा असेल तर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून सहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते व यामध्ये तुम्हाला स्वतः 20 टक्के खर्च करावा लागतो व उरलेले 80 टक्के कर्ज स्वरूपात तुम्हाला बँक देते.
पंजाब नॅशनल बँक देत आहे कर्ज
अशा प्रकारच्या कर्ज सुविधा देणाऱ्या बँकेचा दृष्टिकोनातून बघितले तर पंजाब नॅशनल बँक निवासी घरावर जास्तीत जास्त दहा किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे.
या माध्यमातून तुम्हाला देखील दहा किलोवॉट क्षमतेचे नवीन सोलर पॅनल सिस्टम इन्स्टॉल करायचे असेल तर पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून पन्नास हजारापासून ते 70 हजार रुपये पर्यंत प्रति किलोवॅट कर्जाची रक्कम मिळू शकते.