आर्थिक

युरोपातील नोकरी सोडून सोलापूर जिल्ह्यातील इंजिनीयर तरुणाने उभारला जिरेनियम तेलाचा प्लांट! करतोय लाखोत उलाढाल

Published by
Ajay Patil

कृषी क्षेत्रामध्ये जर तंत्रज्ञानाचा वापर केला व पारंपारिक पिकांना फाटा देत बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या दृष्टिकोनातून पिकांची लागवड केली तर नक्कीच शेती फायद्याचे ठरते हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांचे उदाहरणावरून दिसून येते. मागील काही वर्षांचा विचार केला तर शेती आता खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून होऊ लागली आहे

व याचे प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच प्रमाणात आता उच्चशिक्षित झालेले तरुण शेतीकडे वळले आहेत व असे तरुण शेती व शेती प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती साधताना देखील आपल्याला दिसून येत आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे यांचा विचार केला तर यांनी युरोपमधील नोकरी सोडली व जिरेनियम लागवड व जिरेनियम तेल या व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती साधली आहे.

 अभियंता तरुणाने युरोपातील नोकरी सोडून उभारला जिरेनियम तेलाचा प्लांट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील अभियंता तेजस गुराडे व हर्षाली लोकरे हे अभियंता दांपत्य असून त्यांनी युरोपातील नोकरी सोडली व सध्या त्यांनी जिरेनियम तेलाच्या उत्पादनात स्वतःला झोकून दिले आहे. पंढरपूर येथील तेजस यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले असून त्यांनी एमएस केलेले आहे.

त्यासोबत सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्स या विषयात त्यांनी शिक्षण घेतले असून ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांना युरोपमध्ये चांगली पगाराची नोकरी होती परंतु ती त्यांनी सोडली व ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर स्वतः काहीतरी उत्पादन उत्पादित करावे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले व जिरेनियम ऑइल तयार करण्यासाठी त्यांनी तयारी करायला सुरुवात केली.

याकरिता त्यांनी सगळ्यात अगोदर जिरेनियम तेल खरेदीदारासोबत खरेदी करार केले व जमीन भाड्याने घेऊन प्रत्यक्षपणे या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात केली. जिरेनियम चे उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी रासायनिक खतांच्या वापराला फाटा देत संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेण्यावर भर दिला.

दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही बाजारात जिरेनियमची रोपे घ्यायला गेले तर ते खूप महाग असतात. या अतिप्रमाणात होणाऱ्या खर्चाला आळा बसावा व पैशांची बचत व्हावी याकरिता त्यांनी रोपांऐवजी कंद किंवा स्टिक लावणाऱ्या शेतकऱ्याचा शोध घेतला व कमीत किमतीमध्ये त्यांनी जिरेनियमच्या स्टिक मिळवल्या.

 उभारला जिरेनियम तेलाचा प्लांट

जिरेनियम चे उत्पादन मिळत नाही तोपर्यंत त्यांनी स्वतःचा तेलाचा प्लांट उभा केला. तेव्हा त्यांच्या शेतातून पहिल्यांदाच जिरेनियमचे उत्पादन त्यांना मिळाले. तेव्हा त्यानंतर त्यांनी त्याचे थेट तेलात रूपांतर करण्याचे ठरवले व ते यशस्वी देखील झाले.

आता त्यांनी या जिरेनियम तेलाच्या उत्पादनामध्ये एक लिटर तेलासोबत शंभर लिटर सुगंधी जलाचा उपयोग करण्याचे ठरवले असून या पाण्याला गुलाब जल असे नाव दिले आहे. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या या युनिटमध्ये जे उत्पादन तयार होईल ते निर्यात करण्यासाठी देखील आता पुढील तयारी सुरू केली आहे.

 सरकारी कर्जाची झाली मोठी मदत

तसेच तेजस गुराडे हे या जिरेनियम तेलाचे निर्यात करण्यासाठी प्रयत्न करणार असून या संबंधित अन्य उत्पादने देखील तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

तसेच त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्ज मंजूर झाले असून या कर्जाचा वापर करून ते जिरेनियम तेलाच्या अर्थकारणात नवीन मार्गांचा अवलंब करून येणाऱ्या काळात अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Ajay Patil