आर्थिक

Gold Price : सोन्याची मागणी झाकोळली, पण भारतात काय झालं ? वाचा सविस्तर माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Gold Price : देशात लग्नसराई सुरू होण्यापूर्वी आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी काहीशी वाढली आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवर सोन्याची मागणी घटल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालात देण्यात आली.

‘बार’ आणि ‘नाणी’ची मंद मागणी आणि मध्यवर्ती बँकांच्या भूमिकेमुळे या वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी ६ टक्क्यांनी घटून १,१४७ ५ टन झाली आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ‘सोने वापरणारा देश असलेल्या भारतातील सोन्याची मागणी एका वर्षापूर्वीच्या १९९.७ टनांच्या तुलनेत १० टक्के वाढून चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत २१०.२ टन झाली आहे. भारतात सोन्याच्या किमती नरमल्याने या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

गेल्या तिमाहीत सोन्याचे भाव थोडे कमी झाले होते, पण आता ते वाढू लागले आहेत. धनत्रयोदशीचा सण आणि लग्नाचा हंगाम लक्षात घेता पुढील दोन महिन्यांत सोन्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता परिषदेचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत) सोमसुंदरम पी. आर. यांनी व्यक्त केली.

आढावा तिमाहीमध्ये दागिन्यांची मागणी १४६.२ टनांवरून सात टक्क्यांनी वाढून १५५.७ टन झाली आहे, तर सोन्याच्या बार आणि नाण्यांची मागणी ४५.४ टनांवरून २० टक्क्यांनी वाढून ५४.५ टन झाली असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तिसऱ्या तिमाहीत जागतिक दागिन्यांची मागणी एक टक्क्याने घटून ५७८.२ टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ५८२.६ टन होती.

उच्च किमतीचा परिणाम

सोन्याच्या उच्च किमती आणि आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण ही वर्षभरातील सोने मागणी घसरणीमागील प्रमुख कारणे होती. विशेषत: आशिया आणि मध्य पूर्वेतील काही किंमत – संवेदनशील बाजारपेठांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. चीनमधील तिसरी तिमाही निराशाजनक होती, कारण स्थानिक किमतीच्या उच्च किमतीमुळे ग्राहक खरेदी करण्यास नाखूश होते.

देशातील आयात २२० टनांवर

भारताची सोन्याची आयात तिसऱ्या तिमाहीत वाढून २२० टन झाली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १८४.५ टन होती. सोमसुंदरम म्हणाले की, चौथ्या तिमाहीत सोन्याची मागणी तिसऱ्या तिमाहीप्रमाणेच राहण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी सहा टक्क्यांनी घसरून १,१४७.५ टन झाली.

शेजारील देशामध्ये परिस्थिती

जगातील सर्वाधिक सोन्याचा खप असलेल्या चीनमधील सोन्याची मागणी या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ वाढून २४७ टन झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत २४२.७ टन होती. त्याचवेळी पाकिस्तानची सोन्याची मागणी ११ टक्क्यांनी कमी होऊन ११.६ टन झाली. वर्षभरापूर्वी ती १३ टन होती, तर श्रीलंकेत सोन्याची मागणी ०.३ टनावरून २.४ टन इतकी वाढली आहे

Ahmednagarlive24 Office