केंद्र आणि राज्य सरकार हे विविध विभाग अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असतात व अशा निर्णयांचा फायदा हा कर्मचाऱ्यांना होत असतो. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या मागण्या सरकारकडे असतात व यासंबंधी सध्या तरी सरकार अनेक सकारात्मक पावले उचलताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या रेल्वे खात्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर रेल्वे खात्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात
व अशाच पद्धतीचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे खात्याने आपले कर्मचारी व सेवानिवृत्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला आहे. रेल्वे खात्याने आरोग्य सेवा धोरणामध्ये मोठा बदल केला असून याचा फायदा रेल्वे कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेले व इतकेच नाही तर पेन्शनर्स यांना देखील होणार आहे.
रेल्वे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल शंभर रुपयात युनिक कार्ड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेल्वे खात्याने आरोग्य सेवा धोरणांमध्ये मोठा बदल केला असून रेल्वे आपले कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेले व पेन्शनर यांच्याकरिता युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन म्हणजेच युएमआयडी कार्ड जारी करणार आहे व या कार्डच्या माध्यमातून आता कोणत्याही रेफरन्स शिवाय रेल्वेचे ठराविक हॉस्पिटल व सर्व एम्समध्ये मोफत उपचार घेता येणार आहेत.
हे कार्ड संबंधित कर्मचारी व पेन्शनरच्या विनंतीनुसार शंभर रुपये शुल्क घेऊन जारी केले जाणार आहे. रेल्वे खात्याच्या या निर्णयाचा फायदा रेल्वेच्या सुमारे 12.50 लाख कर्मचारी, पंधरा लाख पेन्शनर्स व अशा कर्मचाऱ्यांवरील दहा लाख आश्रितांना होणार आहे.
रेफरल बाबत कर्मचारी आणि पेन्शनर्स कडून सातत्याने तक्रारी मिळाल्या होत्या. डॉक्टर आपल्या आवडीच्या रुग्णालयांच्या नावाने रेफरल जारी करत होते. परंतु आता या नव्या व्यवस्थेमुळे असे प्रकार पूर्णपणे थांबणार आहेत
काय आहे युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्डचे महत्व?
1- रेल्वेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी तसेच पेन्शनर्स, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमद्वारे त्यांच्या विनंतीवरून कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.
2- हे कार्ड कर्मचारी तसेच पेन्शनरच्या डीजी लॉकरमध्ये ठेवले जाईल. इतकेच नाही तर हे कार्ड एचएमआयएस ॲपवर संबंधित कर्मचारी व पेन्शनरच्या प्रोफाईलवर देखील उपलब्ध असणार आहे.
3- या कार्डच्या माध्यमातून कर्मचारी रेल्वे पॅनल मधील कोणत्याही आरोग्य सेवा संस्थेत उपचार घेऊ शकतील. यासाठी कुठल्याही रेफरलची आवश्यकता भासणार नाही
4- रेल्वेची सर्व रुग्णालय तसेच पॅनल मधील खाजगी रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर मध्ये इमर्जन्सी किंवा सामान्य उपचार घेण्यासाठी या कार्डचा वापर करता येणार आहे.
युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड नसेल तर….
पेन्शनधारक किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्याना युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड जारी न झाल्यास देखील उपचार मिळू शकणार आहेत. रुग्णालयाशी संपर्क केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या माहितीच्या आधारे युएमआयडी नंबर दिला जाईल. यामुळे असे कर्मचारी सुविधांपासून वंचित राहणार नाहीत.
युनिक कार्डमध्ये इतर माहिती सत्यापित केल्यानंतर एचएमआयएस डेटाबेसमध्ये ती भरली जाईल. इतकेच नाहीतर या माध्यमातून आता 25 एम्स, पीजीआयएमइआर चंदिगड, जेआयपीएमईआर पुद्दूचेरी आणि निमहन्स बेंगलोरची ओपीडी आणि आयपीडीत मोफत उपचार मिळणार आहेत.