वाळू तस्करांची दहशत, त्यातून होणारी गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सरकारकडूनच स्वस्तात वाळू मिळावी यासाठी प्रायोगिक तत्त्वावर नगर जिल्ह्यातील ग्राहकांना ऑनलाइन अॅडव्हान्स बुकिंग करून ६०० रुपये ब्रास दराने वाळू विक्री सुरु करण्यात आली होती.
दरम्यान सध्या ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना वाळूसाठी आजही १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्य मंत्रिमंडळाने पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन वाळू ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर विक्री करणाच्या धोरणाला मान्यता दिली आहे.
अद्याप ग्राहक स्वस्त वाळूच्या प्रतीक्षेत असतानाच नव्या धोरणानुसार ग्राहकांना आता एक ब्रास वाळू मागे सहाशे रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांत वाळूसाठी निविदा मागवण्यात येणार आहे. निविदा प्राप्तीनंतरच वाळूचे दर निश्चित केले जाणार आहेत.
नगरसह राज्यात सहाशे रुपये ब्रास दराने १ मे २०२३ पासून बाळू विक्री सुरू झाली होती. गेल्या दहा महिन्यात नगर जिल्ह्यातील १५ वाळू डेपोतून ५४ हजार ब्रासची वाळूची विक्री झाली, यातून ३.५० कोटींचा महसूल प्रशासनाला मिळाला आहे. गेल्या दहा महिन्यात दुस-यांदा वाळू धोरण बदलले आहे. वाळूच्या नव्या धोरणात एका ब्रास वाळू मागे ग्राहकांना सहाशे रुपयांचा महसूल भरावा लागेल.
काळ्या बाजारात १२ हजार ब्रासने होतेय विक्री ?
सरकार सहाशे रुपये ब्रास दराने वाळू ग्राहकांना देत असले तरी त्याची वेळेवर उपलब्धता होत नसल्याने चोरून वाळू विकली जाते. १२ हजार रुपये ब्रासने ग्राहकांना ही वाळू मिळत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी ही वाळू विकली जात असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात १५ डेपोतून ऑनलाइन वाळू विक्री
नगर जिल्ह्यात पहिल्या टप्यात तीन वाळू डेपो सुरू करण्यात आले होते, आता ही संख्या १५ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, वांगी, एकलहरे, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, राहतात तालुक्यातील पुणतांबा, दाढ, पाथरे, भगवतीपुर, संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कुंभारी येथे हे वाळू डेपो सुरू करण्यात आले आहे.