आर्थिक

डाळी व कडधान्याचे भाव देखील गगनाला भिडले !

Published by
Ahmednagarlive24 Office

बदलत्या हवामानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर होणारा परिणाम, वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होणारे पीक, नैसर्गीक आपत्ती आदी कारणांनी भाजीपाला महाग होऊन स्वयंपाक घरातून भाज्या हद्दपार होऊ लागल्या आहेत.

भाजी पाल्याची जागा कडधान्ये व दाळींनी घेतली आहे. परंतु कडधान्य व डाळीचे भाव ‘कडाडल्याने दररोज हातातोंडाची गाठ कशासोबत घालावी या समस्येने गृहीणीना ग्रासले आहे.

पूर्वी कोरडवाहू परिसरात खरीपाच्या पिकामध्ये आंतरपीक घेण्याची पद्धत होती. तूर, मठ, हुलगा ही कडधान्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असत. परंतु वारंवार होत असलेल्या वातावरणीय बदलामुळे व अनियमित पर्ज्यन्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला.

शेतकरी कडधान्य पिकां ऐवजी नगदी पिकांकडे वळल्याने कडधान्ये महागली. जीवनावश्यक वस्तुंचे भाव दररोज वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असाहय होत आहे. गेल्या काही दिवसां पासून फळभाज्या व पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत.

अनेक भाज्यांचे भाव २ रुपयांपासन ७० ते ८० रुपये किलो पर्यंत जाऊन ‘पोहचल्याने घरोघरी डाळी व कडधान्यांपासून तयार केलेल्या कालवणाचे प्रमाण वाढत आहे. परंतु आता साठेबाजीमुळे डाळी व कडधान्याचे भाव देखील गगनाला भिडले असल्याने गृहणीं पुढे पेच निर्माण झाला आहे.

मटकी, मूग दाळ, तुरदाळ, उडीददाळ या सर्वच डाळींचे भाव शंभर रुपयांच्या पुढे ‘पोहचल्याने दररोजच्या आहारातील वरण – भाताची गोडी देखील कमी होत आहे. पूर्वी जिरायत पट्टयात हमखास घेतले जाणारे कडधान्ये, उत्पादनाचे प्रमाण घटल्याने व शेतकर्‍यांना ते मशागतीसही परवडत नसल्याने सध्या सर्वसामान्यांच्या ताटातून गावरान कडधान्ये गायब झाली आहेत.

अलिकडील काळात ठराविक कडधान्ये शेतात घेण्याचा कल दिसत असून तूर व मूग या पिकांना बाजारपेठेत चांगला भाव व ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याने जिरायतासह बागायत क्षेत्रातही ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली जात असली तरी, ही पिके संकरीत आहेत. परंतु शेतकऱ्यांनी हुलगा,मठ,चवळी आदी पिकांकडे पाठ फिरल्याने शेतकऱ्यांनाच ही कडधान्ये बाजारातून विकत घ्यावी लागत आहेत.

Ahmednagarlive24 Office