Financial Tips:- आयुष्यामध्ये आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसे कमवत असतो व त्या माध्यमातून आपण श्रीमंत व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमवतो परंतु मात्र आपल्याकडे हवा तितका पैसा राहत नाही.तेव्हा श्रीमंत होण्याचे जे काही स्वप्न असते ते काही लोकं पूर्ण करू शकतात.
विशेष म्हणजे आपण असे पाहतो की जे लोक जास्त प्रमाणात काम करतात त्यांच्याकडे पैसा कमी असतो व काही लोक जास्त काम न करता देखील श्रीमंत होतात. यामागे जर आपण प्रमुख कारण बघितले तर त्यांचे पैशांचे व्यवस्थापन हे खूप योग्य पद्धतीने असते.
पैशांचे व्यवस्थापन म्हणजे तुम्ही कमावत असलेला पैसा आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवणे खूप गरजेचे असते व तो ताळमेळ जर राखू शकलो नाही तर नको त्या ठिकाणी अनावश्यक खर्च वाढतो व बचत करता येत नाही. साहजिकच बचत करता आली नाही तर गुंतवणूक देखील शक्य होत नाही व भविष्यासाठी पैसे वाचवणे कठीण होऊन बसते.
त्यामुळे फायनान्शिअल मॅनेजमेंट म्हणजेच आर्थिक व्यवस्थापन करण्याची खरी गरज आजकाल आपल्याला दिसून येते. या दृष्टिकोनातून आपण 2025 या वर्षांमध्ये अशा काही टिप्स अवलंबू किंवा स्वतःला एक सवय लावून घेऊ की त्यामुळे आयुष्यातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल व तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न तुम्ही साकारू शकाल.
या टिप्स बनवतील तुम्हाला श्रीमंत
1- बचत आणि गुंतवणुकीचा ताळमेळ- आपल्याला वॉरन बफे हे नाव माहिती असेल. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी ते एक आहेत. ते असं म्हणतात की जर तुम्हाला चांगले गुंतवणूकदार बनायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही बचत करण्याची सवय स्वतःला लावून घेणे गरजेचे आहे आणि ही बचत केलेली रक्कम गुंतवणे देखील तितकेच गरजेचे आहे.
कारण गुंतवणूक तुमची संपत्ती वाढवण्यास मदत करते. जरी तुमचे उत्पन्न दहा हजार रुपये असेल तर तुम्ही दोन हजार रुपये वाचवणे गरजेचे आहे व अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कमाईतील कमीत कमी 20 टक्के रक्कम बचत करून कोणत्याही परिस्थितीत ती गुंतवणूक करावी.
2- एकच ठिकाणी गुंतवणूक करू नये- एकाच ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा तुमची गुंतवणूक विविध ठिकाणी असावी. म्हणजेच तुम्ही गुंतवणुकीमध्ये शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉन्ग टर्म उद्दिष्टानुसार वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा.
तसेच तुम्हाला काही मोठी उद्दिष्ट पूर्ण करायची असतील तर गुंतवणुकीच्या बाबतीत काही जोखीम देखील घ्यावी लागते. कधीकधी तुमच्याकडून सहन होईल एवढीच जोखीम मात्र याबाबतीत घ्यावी.
3- दीर्घकालीन उद्दिष्टांकरिता पॉलिसी किंवा धोरण तयार करावे- तुम्हाला जर बाजारामध्ये पैसे गुंतवायचे असेल तर इतर लोक पैसे गुंतवतात म्हणून तुम्हीही गुंतवू नका. तुम्हाला जर बाजार किंवा मार्केट व्यवस्थित माहित नसेल तर तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.
कारण बाजार हा अनिश्चिततेने भरलेला आहे व त्याचा जितका लवकर फायदा होतो तितके लवकरात लवकर नुकसान देखील होऊ शकते.
अशा वातावरणामध्ये शिस्तबद्ध तसेच दीर्घकालीन धोरण खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक लक्षात घेऊन गुंतवणूक करणे थोडे कमी जोखमीचे असू शकते व आणि तुम्हाला अधिक फायदे मिळवून देऊ शकते.
4- नेहमी विश्वासाहार्य संस्थेमध्ये पैसे गुंतवा- आजकाल झटपट श्रीमंत होण्याचे अनेक मार्ग कोणीही सांगत असते. परंतु असे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्यांच्या बोलण्यामध्ये फसू नका. तुमचा व्यवसाय एका रात्री दुप्पट करण्याच्या आश्वासन देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नका.
जरी एखाद्या ठिकाणी तुम्हाला कमी पैसा किंवा नफा मिळाला तरी विश्वासहार्य संस्थेतच पैसे गुंतवणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला तुमची कमाई गमावण्याच्या जोखमीपासून वाचण्यास मदत होते.
5- तुमची आवड आणि गरजा यातील फरक समजा- तसेच तुमच्या खर्चाचे मॅनेजमेंट करणे देखील तितकेच गरजेचे आहे. आजकाल आपण बघतो की अनेक तरुण त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजांसाठी कर्ज घेतात व क्रेडिट कार्डद्वारे देखील त्यांच्या गरजा पूर्ण करतात.
परंतु अशा प्रकारे जर क्रेडिट कार्डद्वारे तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करत असाल तर बराचसा पगार हा कर्जाचे ईएमआय भरण्यातच जातो. त्यामुळे तुमच्या गरज आणि तुमची आवड यातील फरक समजून घ्या आणि खर्च मर्यादित करा. तुमचा खर्च जर आवश्यकतेपेक्षा म्हणजेच अवाजवी असेल तर तुम्हाला तो कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकतो.
6- या सवयींवर नियंत्रण ठेवा- इतरांकडे पाहून तुम्ही ब्रांडेड कपडे घालत आहात किंवा इतर खर्च करत आहात तर तुमचा अनावश्यक खर्च वाढतो. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयींवर देखील नियंत्रण ठेवावे.
बाहेरचे महागडे जेवण तुमच्या खिशातील पैसा मात्र संपवत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत दररोज बाहेरच्या खाण्याच्या सवयी व इतर अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.