शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,विविध प्रकारच्या अत्याधुनिक लागवडीच्या पद्धती वापरून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याची किमया शेतकऱ्यांना आता साध्य झालेली आहे. वेगवेगळ्या पिकांची लागवड करून बाजारपेठेतील मागणीशी व्यवस्थित सांगड घालून सगळे नियोजन केल्यास खूप चांगला आर्थिक नफा शेतकरी मिळवत आहेत. यामध्ये जर तुम्ही भाजीपाला पिकांचा विचार केला तर कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात लाखो रुपये उत्पन्न मिळवून देणारी पिके म्हणून पाहिले जाते.
भाजीपाला मध्ये मिरची, टोमॅटो तसेच वांगी व भेंडी ही प्रमुख भाजीपाला पिके आहेतच परंतु त्याहीपेक्षा कमीत कमी कालावधीत येणारी कारली, चवळी तसेच इतर वेलवर्गीय भाजीपाला पिके ही खूप उत्तम नफा देण्याची क्षमता असलेली पिके आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी कमीत कमी क्षेत्रात आणि उपलब्ध पाण्याचा सुयोग्य रीतीने वापर करून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर आपण राज्यातील काही जिल्ह्यांचा विचार केला तर काही जिल्ह्यांची ओळख काही विशिष्ट पिकांपूर्ती मर्यादित आहे.
जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर प्रामुख्याने फळबागांमध्ये डाळिंब आणि द्राक्ष व इतर पिकांमध्ये मका आणि कांदा जास्त प्रमाणात लागवड केला जातो व त्याच प्रमाणे जर आपण भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्याने भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
परंतु आता पारंपरिक स्वरूपाची पिके न घेता शेतकरी आता भाजीपाला व फळपिकांकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून या माध्यमातून पारंपारिक पिकांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीचा नफा मिळवत आहेत. याच मुद्द्याला पकडून जर आपण भंडारा जिल्ह्यातील सुरेश ईश्वरकर या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर या शेतकऱ्याने तीन एकर बागायती शेतीमध्ये पाच महिन्यात 6 लाखांचे उत्पन्न घेतल्याची किमया साध्य करून दाखवली आहे.
या शेतकऱ्याने तीन एकरात घेतले सहा लाखाचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुका असून या ठिकाणी भुसा टाकळी या गावचे रहिवासी असलेले सुरेश ईश्वरकर यांनी कृषी विभागाच्या योजनांची मदत घेऊन ठिबक सिंचन व ड्रीपची व्यवस्था केली व या माध्यमातून एक एकर मध्ये काटवलीची लागवड केली. यासोबतच अर्धा एकर क्षेत्रामध्ये चवळीच्या शेंगा आणि अर्धा एकर मध्ये कारले व एका एकर मध्ये मिरचीचे उत्पादन घेतले. या चारही प्रकारच्या पिकांच्या उत्पादनातून त्यांनी चांगला नफा मिळवला व पाचच महिन्यात सहा लाखांचे उत्पादन घेण्याची किमया करून दाखवली.
काटवल लागवड
जर आपण या शेतकऱ्याचे नियोजन पाहिले तर अर्धा एकरमध्ये काटवल लागवड करण्यासाठी त्यांना साधारणपणे तीस हजार रुपयांचा खर्च आला व सध्या त्यांचे काटवलीची तोडणी सुरू असून सहा दिवसानंतर तोडणी करावी लागते. महत्वाचे म्हणजे या काटवलीला किलोला दोनशे रुपयांचा दर मिळाला सध्या ती 160 रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे.
जर आपण त्यांचा महिन्याचा विचार केला तर एका महिन्यामध्ये तीनशे किलोची काटवल विक्री ते करत आहेत. काटवली चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर पाच वर्ष त्यामधून आपल्याला उत्पादन मिळत राहते. सध्या त्यांची काटवल उत्पादन सुरू असून अजून देखील पुढील चार महिन्यांपर्यंत त्यांना उत्पादन मिळणार असून त्यामधून त्यांना दोन लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
कारले लागवड
तसेच त्यांनी कारल्याची देखील लागवड केली असून एका एकर साठी त्यांना 25000 रुपयांचा खर्च आला आहे. सध्या त्यांचे कारल्याचे उत्पादन सुरू असून एका दिवसात कारल्याची तोडणी त्यांना करावी लागत आहे व दोन महिन्यापर्यंत कारले उत्पादन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारले विक्रीतून त्यांना 50 हजार रुपये पर्यंतचा नफा राहिला अशा अपेक्षा आहे.
चवळी लागवड
काटवली व कारल्यासोबत त्यांनी चवळीची देखील लागवड केली आहे व यासाठी त्यांना आतापर्यंत एकूण 25 हजार रुपये इतका खर्च आलेला आहे. या चवळीच्या माध्यमातून देखील त्यांना दोन महिन्यांमध्ये पन्नास हजार रुपयापर्यंतचा नफा मिळणार असल्याची अपेक्षा त्यांना आहे.
मिरची लागवड
यासोबतच त्यांनी मिरचीचे देखील लागवड केले असून त्याचे देखील उत्पादन सध्या सुरू आहे. एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी मिरचीची लागवड केली असून चार महिन्याचा कालावधीत जर मिरची चालली तर अडीच टनापेक्षा जास्त मिरचीचे उत्पादन होण्याची अपेक्षा त्यांना आहे व त्या माध्यमातून तीन लाख रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
या पद्धतीने पिकांचे नियोजन करून भातशेतीतून बाहेर निघत यांनी बागायती भाजीपाला शेतीची कास धरली व चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती मिळवली आहे.