आर्थिक

तिलकने वयाच्या 13 व्या वर्षी छोट्या गुंतवणुकीतून उभारलेला व्यवसाय आज आहे 100 कोटींचा! महिन्याला करतो 2 कोटींची कमाई, वाचा यशोगाथा

Published by
Ajay Patil

एखादा व्यक्ती आयुष्यामध्ये जगत असताना त्याच्यासोबत एखादा प्रसंग घडतो व त्या प्रसंगाला धरूनच त्याच्या डोक्यात एखाद्या व्यवसायाची कल्पना येते व ती कल्पना तो सत्यात उतरवतो आणि मोठा व्यवसाय त्या माध्यमातून उभारतो. अशा प्रकारचे अनेक व्यावसायिक आपल्याला दिसून येतील.

तसेच कष्ट करण्याची ताकद, जीवनामध्ये जर एखादे ध्येय साध्य करण्याचे ठरवले तर जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत न थांबता कष्ट करण्याची तयारी व सातत्य व चिकाटी आणि जिद्द व्यक्तीला यशाच्या शिखरावर नेते. कष्टाच्या जीवावर माणूस अशक्य गोष्ट प्राप्त करू शकतो.

याच मुद्द्याला धरून जर आपण या लेखातील एका तेरा वर्षाच्या मुलाची  यशोगाथा पाहिली तर ती थक्क करणारी आहे व ती वाचल्यानंतर कदाचित काही जणांचा यावर विश्वास बसणार नाही.

परंतु ही यशोगाथा सत्य असून या तेरा वर्षाच्या मुलाचे नाव तिलक मेहता असून त्याने शंभर कोटी रुपयांची कंपनी उभारली असून प्रत्येक महिन्याला या व्यवसायातून तो दोन कोटी रुपयांपर्यंतचे पैसे देखील कमावतो. या लेखात आपण तिलक मेहताची यशोगाथा बघणार आहोत.

 अल्प गुंतवणुकीतून उभारली कंपनी

तिलक मेहताने कमीत कमी गुंतवणुकीचा वापर करून त्याच्या या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. त्याने पेपर एन पार्सल नावाची कंपनी उभारली असून या कंपनी उभारण्याकरिता त्याच्याकडे भांडवल नसल्यामुळे त्यांनी वडिलांकडून काही पैसे घेतले व व्यवसाय वाढवण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या डबेवाल्यांची मदत घेऊन कोट्यावधींचा व्यवसाय सुरू केलेला आहे.

व्यवसायाची कल्पना जर बघितली तर एकदा  तिलक हा त्याच्या काकांच्या घरी गेला असताना जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचे पुस्तक काकांच्या घरीच राहिले. परंतु दुसऱ्या दिवशी त्याच विषयाची परीक्षा असल्यामुळे तिलकला त्या पुस्तकाची खूप मोठ्या प्रमाणावर गरज होती.

परंतु त्यादिवशी कुठलीही डिलिव्हरी करणारी कंपनी ते पुस्तक त्या दिवशी त्याच्या पर्यंत पोहोचवायला तयार नव्हती  व काही कंपन्यांनी पोहोचवायचे मान्य केले परंतु त्यासाठीचे पैसे खूप जास्त मागितले. हीच गोष्ट डोक्यात घेऊन  तिलकला पेपर एन पार्सल कंपनी उभारण्याची कल्पना सुचली व त्यासंबंधीचे काम त्याने सुरू केले.

 पेपर एन पार्सल देते स्वस्त ऑनलाइन सेवा

ऑनलाइन व्यवसाय वाढवण्याकरिता तिलकला पैशांची कमतरता भासत होती व त्यामुळे त्याने एक शक्कल लढवली. आपल्याला मुंबईतील डबेवाले यांचे टिफिन सेवा सगळ्यांना माहिती आहे व तिलकने मुंबईतील डब्बावाला या टिफिन सेवा कंपनीशी संपर्क साधला व 2018 पासून त्यांच्यासोबत ऑनलाइन काम करायला सुरुवात केली.

पेपर एन पार्सल या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने 2018 पासून त्यांना अगदी स्वस्त दरामध्ये विविध गोष्टींची डिलिव्हरी सेवा घरपोच दिली जाते.ज्याप्रमाणे डबेवाले टिफिन पोहोचवतात त्याचप्रमाणे पार्सल देखील पोहोचवण्याचे काम करतात व एकाच दिवसात डिलिव्हरी लोकांपर्यंत त्यामुळे पोहोचते.

या सगळ्यामुळे त्याचा व्यवसाय हळूहळू वाढायला लागला. विशेष म्हणजे या कंपनीच्या स्थापनेपासून आतापर्यंत 200 कर्मचाऱ्यांना या माध्यमातून नोकरी मिळाली असून मुंबईतील पाच हजार डबेवाले या कंपनीशी जोडले गेले आहे व त्यांचे देखील उत्पन्न वाढण्यास यामुळे मदत झालेली आहे.

या कंपनीचे व्हॅल्युएशन आता 100 कोटी रुपयांवर असून तिलक मेहताची एकूण संपत्ती 65 कोटी रुपये आहे. आपण तिलक मेहताचे दररोजचे उत्पन्न पाहिले तर ते सात लाख रुपयांच्या घरात असून या हिशोबाने साधारणपणे महिन्याला दोन कोटी रुपयांची कमाई तो करतो.

तिलक मेहताच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की एखादी छोटीशी कल्पना देखील कष्टाने माणूस किती मोठ्या स्तरापर्यंत नेऊ शकतो.

Ajay Patil