आर्थिक

व्यवसायाची वाढ करायची आहे का? तर कॅश क्रेडिट येईल कामाला; वाचा कॅश क्रेडिट म्हणजे नेमके काय? कसा होतो व्यवसायात फायदा?

Published by
Ajay Patil

Benefit Of Cash Credit:- तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला अगोदर गुंतवणूक करावी लागते आणि गुंतवणूक केल्यावरच तुम्हाला व्यवसाय सुरू करता येतो. परंतु त्यानंतर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशाची आवश्यकता भासते.

तुम्हाला जर व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर तुम्हाला अतिरिक्त पैशांची गरज भासते व यावेळी तुम्हाला अडचणी येऊ शकतात. अशावेळी कुठून पैसा उभा करावा? याची चिंता बऱ्याच जणांना पडते.

अशाप्रसंगी व्यवसाय वाढायचा असेल तर कॅश क्रेडिटचा वापर तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. कॅश क्रेडिट म्हणजे बँकांनी एखाद्या कंपनीला त्यांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेली एक रक्कम असते याला शॉर्ट टर्म फंडिंग किंवा लोन देखील म्हटले जाते.

कॅश क्रेडिट म्हणजे नेमके काय व कसे असते त्याचे स्वरूप?
कॅश क्रेडिट याचा अर्थ जर आपण बघितला तर साधारणपणे एखाद्या व्यवसायाला किंवा कंपनीला बँकांच्या माध्यमातून व्यवसायातील गरज भागवण्यासाठी दिलेली रक्कम म्हणजेच कॅश क्रेडिट होय. याला शॉर्ट टर्म फंडिंग किंवा लोन म्हटले जाते.

कॅश क्रेडिट देताना बँक कंपनीचा मागील ट्रांजेक्शन किंवा क्रेडिट हिस्टरी आणि इतर आर्थिक बाबी तपासते व त्यानंतर कॅश क्रेडिट द्यावे की नाही याबाबतचा निर्णय घेत असते.

बँकेने तुम्हाला कॅश क्रेडिट दिले तर त्या पैशांचा वापर तुम्ही व्यवसायातील अतिशय महत्त्वाच्या कामांसाठी करू शकतात व तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर कॅश क्रेडिट मध्ये मिळालेल्या पैशांचा वापर तुम्ही कंपनी करिता लोकांना कामावर नियुक्त करण्यासाठी तसेच कंपनीचा विस्तार, व्यवसायासाठी लागणारी इतर आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी आणि प्लांट किंवा कच्च्या मालाच्या खरेदीसाठी करू शकतात.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे या पैशांचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी करू शकतात. तुमच्याजवळ जी काही प्रॉपर्टी आहे ती बँकेला तारण ठेवून तुम्हाला कॅश क्रेडिट मिळत असते.

कॅश क्रेडिटच्या माध्यमातून जे काही पैसे तुम्हाला मिळतात त्याची फेड तुम्ही बारा महिन्यात करू शकतात व नंतर तिला रिन्यू देखील करता येते.

व्यवसाय वाढीसाठी कॅश क्रेडिट फायद्याचे कसे ठरते?
कॅश क्रेडिट हे एक प्रकारे अल्पमुदतीचे कर्ज असून बारा महिन्यापर्यंत तुम्हाला त्याची परतफेड करता येऊ शकते. यावर तुम्हाला तुम्ही जी काही रक्कम काढाल त्यावरच व्याज द्यावे लागते. जी रक्कम मंजूर झाली आहे त्या पूर्ण रकमेवर व्याज देण्याची गरज भासत नाही.

तुम्हाला जितकी रक्कम मंजूर झालेली आहे त्यातून तुम्ही तुम्हाला हवे तितकी वेळा पैसे काढू शकतात. तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोर आणि परतफेडीचा इतिहास जर चांगला असेल तर तुम्ही कॅश क्रेडिटद्वारे मोठी रक्कम देखील मिळवू शकतात.

कॅश क्रेडिट ची मर्यादा ठरवताना बँक तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आणि इतर आर्थिक गोष्टी लक्षात घेऊन ठरवत असते. यामध्ये तुम्ही जे काही व्याज भरता त्यावर तुम्हाला टॅक्स बेनिफिट देखील मिळतो.

तुम्ही तुमच्या फिक्स डिपॉझिट वर देखील कॅश क्रेडिटचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच कॅश क्रेडिटमुळे तुम्हाला व्यवसाय तर वाढवता येतोच परंतु इतर फायदे देखील घेता येऊ शकतात.

कॅश क्रेडिटचा कसा कराल वापर?
तुम्ही जर एखादा व्यवसायाचे मालक असाल तर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर कच्चा माल नसेल तर मात्र व्यवसाय चालवायला अडथळे येऊ शकतात. अशावेळी तुम्ही कॅश क्रेडिट मिळवून कच्चामाल खरेदी करून तुमच्या व्यवसायातील अडचण दूर करू शकता. तुम्ही जे काही उत्पादन घेत आहात त्याचा स्टॉक तुमच्याकडे असणे खूप गरजेचे असते.

अशा पद्धतीने तुम्ही कॅश क्रेडिटचा वापर करून तुमची इन्व्हेंटरी मॅनेज करू शकता व ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेळेत उत्पादन पोहोचवू शकतात. कर्मचाऱ्यांचा पगार आणि रेंटचाही तुम्हाला विचार करावा लागतो. या दोन्ही गोष्टींसाठी देखील तुम्ही कॅश क्रेडिटमध्ये मिळालेली रक्कम वापरू शकता.

म्हणजे व्यवसायातील आर्थिक ताण दूर करण्यासाठी कॅश क्रेडिट खूप फायद्याचे ठरते. तुम्हाला तुमच्या व्यवसायातील विक्री वाढवायची असेल तर काही पॉलिसींवर तुम्हाला काम करावे लागते व त्यासाठी मार्केटिंग ही महत्त्वाची ठरते. त्यामुळे मार्केटिंगवर देखील तुम्ही कॅश क्रेडिटमध्ये मिळालेला पैसा खर्च करू शकतात व तुमच्या व्यवसायाचा सेल वाढवू शकता.

Ajay Patil