Scheme For Women:- महिलांच्या समीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे पावले उचलण्यात येत आहेत व या माध्यमातून महिलांचे आर्थिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून विकास व्हावा हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. तसेच महिला स्वावलंबी होणे खूप गरजेचे असल्याकारणाने महिलांसाठी केंद्र सरकार देखील अनेक महत्त्वपूर्ण अशा योजना राबवत आहे.
अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना उद्योग व्यवसाय उभारणीकरिता देखील आर्थिक मदत करण्यात येते व या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या महिला स्वावलंबी होण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होते.
अगदी याच पद्धतीने केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाकरिता विमा सखी योजना आणली आहे व या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांना रोजगार मिळणे देखील शक्य होणार आहे
व महिन्याला सात हजार रुपये देखील या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळू शकणार आहे. त्यामुळे नेमकी ही योजना काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊ.
विमा सखी योजनेचे स्वरूप कसे आहे?
विमा सखी योजना ही प्रामुख्याने एलआयसीची योजना असून या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येणार आहे व याकरिता महिलांनाच अर्ज करता येणार आहे.
या योजनेच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महिलांनाच स्टायपेंड दिला जाणार आहे व या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र महिला असतील त्यांना तीन वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल व या कालावधीत महिला एलआयसी एजंट म्हणून देखील काम करू शकणार आहेत.
विमा सखी योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महिला पदवीधर असतील अशा महिलांना एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून देखील काम करता येणे शक्य होणार आहे.
विमा सखी योजनेचा लाभ घ्यायचा तर या आहेत प्रमुख अटी
1- महिलांना जर विमा सखी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे.
2- तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचे वय किमान 17 आणि कमाल 70 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
3- महत्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत तीन वर्षाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे व त्यानंतर महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना किती पैसे मिळतील?
विमा सखी योजनेच्या माध्यमातून ज्या महिला प्रशिक्षण घेतील त्या महिलांना स्टायपेंड स्वरूपात वेतन दिले जाणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी प्रतिमहिना सात हजार रुपये, प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये महिलांना दिले जातील. यामध्ये कमिशनचा समावेश केलेला नसेल.
यामध्ये कमिशन स्वरूपात मिळणारे जे काही पैसे असतील ते या व्यतिरिक्त वेगळे दिले जातील. यामध्ये दुसरे आणि तिसऱ्या वर्षी मिळणारे अनुक्रमे सहा आणि पाच हजार मिळवण्यासाठी एक अट आहे व ती म्हणजे पहिल्या वर्षी ज्या पॉलिसी काढून दिले आहेत त्यातल्या 65 टक्के योजना दुसऱ्या वर्षी देखील सुरू असणे गरजेचे आहे.
एलआयसीच्या या योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विमा सखी योजनेकरिता ज्या महिला अर्ज करतील त्यांच्यापैकी कोणीही एलआयसी कर्मचारी नसावा. इतकेच नाही तर त्यांच्या नात्यात कोणीही एलआयसी कर्मचारी असता कामा नये.
तसेच या योजनेअंतर्गत ज्या महिलांना काम मिळेल त्या महिला एलआयसीच्या नियमित कर्मचारी नसतील हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.
कसा करावा या योजनेसाठी अर्ज?
एलआयसीच्या या विमा सखी योजनेकरिता जर अर्ज करायचा असेल तर एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळ https://licindia.in/test2 यावर जाऊन त्या ठिकाणी विमा सखी योजना या लिंक वर क्लिक करावे. तसेच तुमचे नाव तसेच जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता टाकावा.
त्यानंतर आलेला कॅपच्या कोड नमूद करून अर्ज सबमिट करावा. तसेच यासोबत दहावी पास झाल्याचे प्रमाणपत्र व पत्त्यासाठीचा पुरावा तसेच वयाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.