अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-2021 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँक ठेवींवरील विद्यमान 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण 5 लाखांपर्यंत वाढवण्याची मोठी घोषणा केली.
अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँका बंद झाल्या किंवा त्या बुडाल्या नंतरही ग्राहकांना नुकसान भरपाई दिली जाईल. याशिवाय बँक खातेदारांच्या विम्याची रक्कम 1 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येत आहे.
म्हणजेच ग्राहकांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहणार आहेत. 1993 नंतर आतापर्यंत डिपॉझिट गॅरंटी लिमिट बदलली नव्हती आणि खातेदारांना यासाठी एक लाख रुपये मिळत होते. डिपॉझिट विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) अधिनियम 1961 अंतर्गत आतापर्यंत बँक ठेवींपैकी केवळ एक लाख रुपये देण्यात येत होते.
पण आता ठेवीदाराला यासाठी पाच लाख रुपये मिळतील. पीएमसी बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर सरकारचे लक्ष याकडे वेधले गेले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 1.75 लाख कोटी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य जाहीर केले. एलआयसीसह अनेक कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून हे लक्ष्य पूर्ण केले जाईल.
एलआयसीमधील हिस्सेदारी विक्री करण्याची घोषणा मागील अर्थसंकल्पातच करण्यात आली होती. पण कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्येही 20,000 कोटी रुपयांच्या भांडवलाची घोषणा झाली आहे.
अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांमध्ये पैसा सुरक्षित राहील याची पुरेशी व्यवस्था केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही सिक्योरिटी मार्केट कोड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.