आर्थिक

डीमार्टमध्ये कोणत्याही वस्तू स्वस्त का मिळतात? डीमार्टची स्थापना कशी झाली? 12 वी पास व्यक्तीने केली डीमार्टची स्थापना

Published by
Ajay Patil

भारतामध्ये अनेक रिटेल चेन अर्थात रिटेल नेटवर्क असून अनेक प्रसिद्ध असे ब्रँड आहेत. कुठल्याही ब्रँडच्या मागे त्या त्या ब्रँडच्या उभारणीपासून ते यशस्वी होण्यामागे एक वेगळी कहाणी असते. अगदी त्याच पद्धतीची एक वेगळी आणि प्रेरणादायी कहाणी डी मार्टची देखील आहे. डी मार्टचे वैशिष्ट्य म्हणजे स्वस्त वस्तू मिळण्यासाठी संपूर्ण भारतात हे प्रसिद्ध असून अनेक मोठ्या शहरांमध्ये व मेट्रो शहरांमध्ये डी मार्टचा लौकिक वाढलेला आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर डी मार्ट इतके प्रसिद्ध आहे की ज्या ठिकाणी डी मार्ट उभारले जाते त्या ठिकाणी विकसित होत असलेली वस्ती किंवा काही महत्त्वपूर्ण भाग जरी नसेल तरी त्या ठिकाणी जमिनीचे दर गगनाला पोहोचतात. कारण गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असते की काहीतरी भविष्याचा विचार करूनच डी मार्ट अशा ठिकाणी गुंतवणूक करत आहे आणि भविष्यामध्ये ते क्षेत्र वाढेल ही अपेक्षा लोकांना असते.

इथपर्यंत डी मार्ट प्रसिद्ध झालेले आहे. डीमार्टची उभारणी करण्यामागे जर कोणाचे डोके असेल तर त्यांचे नाव आहे राधाकिशन दमानी हे होय. राधाकिशन दमानी हे नाव असे आहे की ज्यांना प्रसिद्ध शेअर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला देखिल गुरु मानत होते. राधाकिशन दमानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते किंवा ते गणले जातात. त्यांच्या संपत्तीचा विचार केला तर त्यांची संपत्ती एक लाख कोटींपेक्षा जास्त आहे. परंतु त्यांचे शिक्षण जर पाहिले तर ते अवघे बारावी उत्तीर्ण आहेत. परंतु त्यांच्यात असलेली कौशल्य आणि कुशाग्र बुद्धिमत्ता या गुणांच्या जोरावर त्यांच्याकडे आज कोट्यावधीची संपत्ती आहे.

 डीमार्टची सुरुवात कशी झाली?

शेअर बाजारामध्ये खूप काम केल्यानंतर राधा किशन दमानी यांच्या मनामध्ये स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा असा विचार आला व त्यासंबंधीचा निर्णय त्यांनी घेतला. व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साधारणपणे 1999 यावर्षी त्यांनी पहिल्यांदा नेरूळची फ्रेंचाईची घेतली.

परंतु या व्यवसायात ते सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी बोरवेल बांधायला सुरुवात केली पण या कामात देखील त्यांना अपयश आले. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सन 2002 मध्ये मुंबईमध्ये डी मार्टचे पहिले स्टोर उघडले व येथूनच डी मार्टची सुरुवात झाली.

राधाकिशन दमानी यांनी ज्या ज्या ठिकाणी डी मार्ट स्टोअर उघडले आहेत त्यासंबंधी त्यांनी असे ठरवले आहे की कोणत्याही प्रकारच्या भाड्याच्या जागेमध्ये डी मार्ट स्टोअर सुरू करायचे नाही. आज पाहिले तर देशामध्ये 300 पेक्षा अधिक डी मार्टचे स्टोअर असून राधाकिशन दमानी यांच्याकडे 300 खूप मोठ्या आकाराच्या जमिनी देखील आहेत. डी मार्टचे स्टोअर सध्या अकरा राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

 डी मार्टमध्ये वस्तू स्वस्त का मिळतात?

डी मार्ट मध्ये तुम्ही कुठलीही वस्तू घ्याल तर तुम्हाला ती अगदी स्वस्तात मिळेल व याच्यामागे देखील एक कारण आहे. ते म्हणजे राधाकिशन दमाने यांनी भाड्याच्या जागेवर दुकान उघडल्यामुळे वस्तू स्वस्त देण्यामध्ये त्यांना खूप मदत होते. त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत व त्यांना नियमित अंतराने भाडे द्यावे लागत नाही आणि हा जो काही खर्च वाचतो तो माल स्वस्त देण्यासाठी त्याचा वापर त्यांना करता येतो.

यामध्ये पाच ते सात टक्के डी मार्ट बचत करते व सवलतीच्या रूपात लोकांना वस्तू पुरवते. डी मार्टचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जो काही त्यांच्याकडे मालाचा स्टॉक आहे तो ताबडतोब क्लिअर करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते. जास्तीत जास्त 30 दिवसांमध्ये संपूर्णपणे माल संपवून नवीन माल मागवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते.

तसेच ज्या कंपन्यांकडून मालाचा पुरवठा होतो त्यांचे पेमेंट देखील लवकरात लवकर डी मार्टच्या माध्यमातून केले जाते व त्यामुळे उत्पादक कंपन्या देखील डी मार्टला सवलतीच्या दरात वस्तू देतात. या पद्धतीच्या सवलतींचा वापर ते लोकांना सवलतीत किंवा कमी किमतीत वस्तू पुरवण्यासाठी करतात व स्वतःचा महसूल वाढवण्यासाठी देखील याची मदत होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil