अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-   नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा, आढाववाढी आदी परिसरात शुक्रवारी दुपारी ढगफुटी झाली असून तासाभरात अकरा मिमी पाऊस झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या पावसामुळे वांबोरीत करपरा नदीला पूर आला. वांबोरीचा काही कालावधीसाठी नगरशी रस्ता संपर्क तुटला होता. पिंपळगाव माळवी तलावही ओसंडून वाहत आहे.

त्यामुळे पावसाचा जोर थोडा वाढला तरी सर्वत्र पाणीच पाणी होते. वांबोरीतून वाहणाऱ्या करपरा नदीचे पाणलोट क्षेत्र गोरक्षनाथगड पायथा, डोंगरगण, मांजरसुंबा या क्षेत्रात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली.

तासाभरातच अकरा मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. पिंपळगाव माळवी तलावाच्या सांडव्यावरूनही पाण्याची पातळी वाढली.

वांबोरीत करपरा नदीला आलेल्या पुरामुळे नगरवेस जवळील पुल तसेच सरकारी वफा गॅरेजजवळील पुलावरून पाणी वेगाने पाणी वाहात होते.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार एफ. आर. शेख, मंडलाधिकारी दत्ता गोसावी, तलाठी अभिजित क्षीरसागर यांनी सायंकाळी चारच्या सुमारास पुराची पाहणी केली.