file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

जिल्ह्यात या वयोगटात 2 लाख 38 हजार 943 एवढे मुले-मुली आहेत. 3 ते 11 जानेवारी या आठ दिवसांत त्यातील 1 लाख 22 हजार 64 जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. हे प्रमाण 51 टक्के झाले आहे.

म्हणजे आठच दिवसांत निम्म्या मुलांना लस देण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. अजून आठ दिवसांत उर्वरित उद्दिष्टही पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बुस्टर डोसही सुरू झाला आहे.

दोन दिवसांत 3 हजार 252 फ्रंटलाईन कर्मचार्‍यांसह ज्येष्ठांना डोस देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत 2212 आरोग्य कर्मचारी, 466 फ्रंटलाईन वर्कर, तर 574 ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यात 15 वर्षांपुढील वयोगटात एकूण 38 लाख 42 हजार 543 जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 30 लाख 59 हजार 346 (79.06 टक्के) जणांनी पहिला,

तर 18 लाख 64 हजार 207 (48.5 टक्के) जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत असे एकूण 49 लाख 26 हजार 805 डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.