अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या 44 हजार 555 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कांदा लागवडीत सर्वाधिक पारनेर तालुक्यात 16 हजार 548 हेक्टर क्षेत्र असून त्या खालोखाल 16 हजार 84 हेक्टर क्षेत्र हे नगर तालुक्यात आहे.

श्रीगाेंंदा तालुक्यात 8 हजार 277 हेक्टर तर पाथर्डी तालुक्यात साडेतीन हजार हेक्टर कांदा पिकाचे क्षेत्र आहे. उर्वरित तालुक्यात कांदा पिकाचे लागवडीचे क्षेत्र कमी अथवा नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात आहे.

जिल्ह्यात अद्याप अनेक तालुक्यांत पावसाच्या पाण्याचा वाफसा झालेला नाही. यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झालेली नाही.

असे असतांना खर्चीक असणार्‍या कांदा पिकाची नगर आणि पारनेर तालुक्यात सर्वाधिक लागवड झालेली आहे. कांदा पीक म्हणजे मोठे खर्चिक पीक, लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाला पैशाची गरज असते.

एवढे सगळे करून कांद्याला भाव मिळाला, तर शेतकर्‍यांचा पैसा वसूल अन्यथा भाव न मिळाल्यास शेतकर्‍याला खिशाला कात्री लागण्याची वेळ येते. असे असताना शेतकर्‍यांचा कांदा लागवडीकडे मोठा कल असतो.