file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडी तसेच आयकर विभागाकडून राज्यातील अनेक ठिकाणी छापासत्र सुरु आहे. या बेधडक कारवाईमुळे अनेक राजकीय नेतेमंडळींच्या अडचणीत भर पडली आहे.

तसेच याकारवाईमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. यातच खासदार उदयनराजे यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना घराचा आहेर दिला आहे.

जसे आपण पेरतो तसे उगवते. आमच्यामागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे.

सर्वांचीच पुराव्यासकट ईडीला यादी देतो, असे सांगत भाजप खासदार राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईवरून स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढतात. बास झालं आता राजकारण, अशा शब्दांत उदयनराजे यांनी ईडी कारवाईच्या मुद्दय़ावरून भाजपसहित इतर पक्षांवरही टीका केली.

कोणीही असू दे, मी ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो, असे त्यांनी ईडीच्या कारवाईमागे भाजपचे षड्यंत्र असल्याच्या आरोपाविषयी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आदी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपकडून राजकारणासाठी होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात आहे.

मात्र भाजपकडून हे आरोप सातत्याने फेटाळून लावले जात आहेत. दरम्यान, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सोयिस्करपणे हे सर्व सुरू असल्याचे म्हटले आहे.