अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आरबीआयने जरी अर्बन बँकेवर निर्बंध लादले असले, तरी बँक वाचली पाहिजे, अशी भूमिका घेत अर्बन बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी खासदार या नात्याने केंद्रीय अर्थमंत्री व आरबीआयकडे पाठपुरावा करणार आहे.

असे आश्वासन खा. डॉ. सुजय विखे यांनी दिले. तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, माझ्या यशात स्व. दिलीप गांधी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे.

त्यामुळे अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य करू असे म्हणतच त्यांनी नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळ नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. खा. विखे पुढे म्हणाले की, अर्बन बँकेवर निर्बंध आले आहेत,

असे कळले असले तरी नियोजित कार्यक्रमानुसार मी बँकेत आलो आहे. बँकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले असताना, अचानकपणे बँकेवर निर्बंध येणे ही दुर्दैवी बाब आहे.

पण मला विश्वास आहे की अर्बन बँक पुन्हा सुस्थितीत येईल. बँकेला म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी लवकरात लवकर आरबीआयच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन अर्बन बँकेची बाजू मांडणार आहे.

विखे व गांधी कुटुंबीयांचे वर्षानुवर्षे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे स्व. गांधी यांच्या अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य खासदार म्हणून मी सहकार्य करीन असे विखे म्हणाले.